अफगाणिस्तानचा प्रश्‍न व दहशतवादाच्या विरोधात भारत मध्य आशियाई देशांशी सहकार्य वाढविणार

नवी दिल्ली – अफगाणिस्तानच्या जनतेला तातडीने अत्यावश्यक सहाय्य पुरविणे, दहशतवादाच्या विरोधात कठोर भूमिक आणि भारताचे मध्य आशियाई देशांमधील सर्वच आघाड्यांवरील सहकार्य व्यापक करण्यावर दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाले आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘इंडिया-सेंट्रल एशिया डायलॉग’मध्ये मध्य आशियातील पाच देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अफगाणिस्तानसह, व्यापार, कनेक्टिव्हिटी तसेच क्षमता वाढविण्यासंदर्भातील सहकार्य यासंदर्भात एकसमान भूमिका स्वीकारली आहे. याचा दाखला देऊन किरगिझिस्तान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांबरोबरील भारताचे सहकार्य नव्या उंचीवर जाईल, असा विश्‍वास परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला आहे.

अफगाणिस्तानचा प्रश्‍न व दहशतवादाच्या विरोधात भारत मध्य आशियाई देशांशी सहकार्य वाढविणारपाकिस्तानात ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन-ओआयसी’ची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा वापर करून पाकिस्तान अफगाणिस्तानबाबतची आपली भूमिका पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. याच्या बरोबरीने आपले महत्त्व वाढवून ओआयसीच्या सदस्यांकडून सहाय्य मिळविण्यासाठी पाकिस्तानची धडपड लपून राहिलेली नाही. अशा परिस्थितीत किरगिझिस्तान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या मध्य आशियाई देशांनी आपले परराष्ट्रमंत्री नवी दिल्लीतील ‘इंडिया-सेंट्रल एशिया डायलॉग’साठी पाठविले. भारताने जाणीवपूर्वक पाकिस्तानला धक्का देण्यासाठी या परिषदेचे आयोजन केल्याचा ठपका काही पाकिस्तानी पत्रकारांनी केला आहे.

विशेषतः अफगाणिस्तानासंदर्भात भारत व मध्य आशियाई देशांनी एकसमान भूमिका स्वीकारून अफगाणी जनतेला तातडीने सहाय्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होता कामा नये, अशी ठाम भूमिकाही या परिषदेत घेण्यात आली आहे. हा पाकिस्तानला बसलेला आणखी एक धक्का ठरतो. मध्य आशियाई देशांबरोबरच रशिया व इराण हे देश देखील अफगाणिस्तानसंदर्भातील भारताची भूमिका उचलून धरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तालिबानच्या हाती अफगाणिस्तानची सत्ता आल्यानंतर, भारताचा अफगाणिस्तानातील प्रभाव पूर्णपणे संपुष्टात आल्याचे दावे ठोकणार्‍या पाकिस्तानचा भ्रमनिरास झाला आहे.

भारत लवकरच तालिबानला मान्यता देईल आणि यासाठी भारताने रशिया, इराण व मध्य आशियाई देशांच्या साथीने पावले उचलली आहेत, असे दावे पाकिस्तानचेच बुजूर्ग पत्रकार करीत आहेत. यामुळे पाकिस्तानची तारांबळ उडाल्याचे दिसते. भारताने पाकिस्तानच्याही आधी तालिबानला मान्यता दिली अथवा तालिबानचे राज्य असलेल्या अफगाणिस्तानला भरीव सहाय्य पुरविले तर तालिबान ते नक्कीच लक्षात ठेवतील. पुढच्या काळात भारताला याचा फार मोठा लाभ मिळेल, असे या पाकिस्तानी पत्रकारांचे म्हणणे आहे. भारताने अत्यावश्यक औषधांचा पुरवठा केल्यानंतर, तालिबानच्या एका नेत्याने पाकिस्तानचा उल्लेख आपला सर्वात मोठा शत्रू असा केला होता, ही बाब पाकिस्तानी विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत.

असे असले तरी पाकिस्तान भारताच्या आधी तालिबानच्या राजवटीला मान्यता देऊ शकणार नाही. कारण तसे झाल्यास तालिबानला पाकिस्ताननेच सहाय्य करून अफगाणिस्तानच्या सत्तेवर आणले, हा आरोप सिद्ध होईल. यानंतर तालिबानच्या कारवायांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरले जाईल. म्हणूनच पाकिस्तान तालिबानची नाराजी पत्करून त्यांच्या राजवटीला मान्यता देण्याचा निर्णय घेत नाही, असे पाकिस्तानी विश्‍लेषक सांगत आहेत.

भारताने मात्र या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी मुत्सद्देगिरीची प्रदर्शन केले असून आपल्या देशाला खिंडीत गाठले आहे, अशी कबुली पाकिस्तानच्या या विश्‍लेषकांनी दिली आहे.

leave a reply