अहमदाबादमधील कोविड सेंटरला लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू

अहमदाबाद – गुजरातच्या अहमदाबादमधील एका खाजगी रुग्णालयातील कोविड सेंटरला आग लागून ८ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवरंगपुरा परिसरात असलेल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवली. पोलिसांनी रूग्णालयाच्या ट्रस्टींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

अहमदाबादमधील कोविड सेंटरला लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यूगुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास श्रेय रूग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील आयसीयू वॉर्डमध्ये आग लागली. या रूग्णालयात करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत एकूण ८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ५ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश आहे.

अहमदाबादमधील कोविड सेंटरला लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यूआग लागल्याचे कळताच रुग्णालयातील सर्वजण जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. या आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ४० जणांना यातून वाचविले. या सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकऱ्यानी दिली आहे. या रूग्णालयात अग्नी सुरक्षेची काळजी घेण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) संगीता सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सरकारने आगीच्या घटनेत मृत पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

leave a reply