इराणच्या ऑईल रिफायनरीमध्ये आगीचा भडका

- 11 जण जखमी

तेहरान – आगीच्या भडक्यात नौदलाच्या खर्ग जहाजाला जलसमाधी मिळून काही तास उलटत नाही तोच इराणची राजधानी तेहरानमध्ये ऑईल रिफायनरीमध्ये आगीने पेट घेतला. अवघ्या काही तासांच्या फरकाने पेटलेल्या या आगीने इराण हादरले. बुधवारच्या रात्रीपर्यंत धगधगत असलेल्या या आगीवर गुरुवारी पहाटे नियंत्रण मिळविल्याचा दावा स्थानिक यंत्रणेने केला. पण अजूनही इथे धूराचे लोट दिसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

इराणच्या ऑईल रिफायनरीमध्ये आगीचा भडका - 11 जण जखमीइराणची राजधानी तेहरानच्या दक्षिणेकडे असलेल्या ‘तोंदगुयान पेट्रोकेमिकल कंपनी’च्या प्रकल्पात बुधवारी आगीने पेट घेतला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. ही एक दुर्घटना असल्याचे या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. प्रकल्पातील लिक्विफाईड गॅसच्या लाईनमध्ये गळती होऊन स्फोट झाला. पण या गळतीचे कारण या अधिकार्‍यांनी स्पष्ट केलेले नाही.

गुरुवारी पहाटे या आगीवर नियंत्रण मिळविल्याचे स्थानिक यंत्रणांनी जाहीर केले. पण हा दावा निकालात काढणारे फोटोग्राफ्स पाश्‍चिमात्य माध्यमे आणि स्थानिकांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. गुरुवार दुपारपर्यंत सदर प्रकल्पातून धूराचे मोठे लोट बाहेर पडत असल्याचे माध्यमे आणि स्थानिकांनी म्हटले आहे. या दुर्घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती इराणी यंत्रणांनी दिली होती. पण गुरुवारी दुपारपर्यंत जखमींची संख्या 11 वर पोहोचली असून चार जणांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे इराणी यंत्रणांनी जाहीर केले.

इराणच्या ऑईल रिफायनरीमध्ये आगीचा भडका - 11 जण जखमी1968 सालापासून कार्यरत असलेल्या या कंपनीमधून दरदिवशी अडीच लाख बॅरल्स इतक्या इंधनाची निर्मिती केली जाते. राजधानी तेहरानच्या बाहेर थाटण्यात आलेल्या इंडस्ट्रियल झोनमध्ये ही कंपनी उभारण्यात आली होती. त्यामुळे सर्व निकषांचे पालन करण्यात आल्याचे सरकारी यंत्रणा सांगत आहेत. पण गेल्या काही महिन्यांपासून इराणमधील इंधन व रासायनिक कंपन्यांमधील स्फोटांचे प्रमाण वाढत असून इंडस्ट्रियल झोनमधील अशा दुर्घटनांची संख्या मोठी असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

दहा दिवसांपूर्वी इराणच्या फटाके बनविणार्‍या कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ जणांचा बळी गेल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले होते. पण ही कंपनी फटाके बनविणारी नसून ड्रोन्सची निर्मिती करणारी होती, असा दावा ब्रिटनच्या वर्तमानपत्राने केला होता. गेल्या महिन्यात इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष भडकलेला असताना, या कंपनीच्या ड्रोनचा वापर इस्रायलवर हल्ला चढविण्यासाठी केल्याची बातमी ब्रिटीश वर्तमानपत्राने दिली होती. या घटनेला तीन दिवस उलटत नाही तोच इराणच्या आणखी एका पेट्रोकेमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात एकाचा बळी गेला होता.

तर बुधवारी तेहरानमधील इंधन कंपनीत ही आग भडकण्याच्या काही तास आधी, ओमानच्या आखातात इराणी नौदलाच्या मोठ्या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. या जहाजावर स्फोट झाला होता. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती इराणी नौदलाचे माध्यमप्रमुख बेहझाद जहानियन यांनी सांगितले.इराणच्या ऑईल रिफायनरीमध्ये आगीचा भडका - 11 जण जखमी

गेल्या वर्षभरापासून इराणच्या इंधन, रासायनिक तसेच सरकार व लष्कराशी संबंधित कंपन्या, ठिकाणे आणि जहाजांवर संशयास्पद स्फोट होऊन आगी भडकत आहेत. यामध्ये बकरशहर, झेरगान, बुशहेर येथील कंपन्या प्रकल्प तर लष्कराशी संबंधित नातांझ, पारचिन प्रकल्प आणि कोठारांमध्ये संशयास्पट स्फोट झाले. याशिवाय रेड सीच्या क्षेत्रात इराणी नौदलाच्या साविझ आणि सिरियाच्या सागरी हद्दीत इंधनवाहू जहाजात स्फोट झाले होते. अशा डझनहून अधिक स्फोटांची नोंद झाली आहे.

एकट्या नातांझ प्रकल्पात वर्षभरात तीन स्फोट झाले आहेत. पण यापैकी फक्त एप्रिल महिन्यात नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या स्फोटासाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरले होते. आपल्या अणुकार्यक्रमाला हादरा देण्यासाठी इराणने हा स्फोट घडविल्याचा आरोप इराणने केला होता. याशिवाय इराणने देखील इस्रायलच्या मालवाहू तसेच लष्करी जहाजांवर स्फोट केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. हे स्फोट म्हणजे इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असललेे अघोषित युद्धच असल्याचा दावा केला जातो. मात्र यातील सर्वच स्फोटांना इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप इराणने केलेला नाही.

leave a reply