राजकोटमधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत पाच जणांचा बळी

- ‘देशभरातील रुग्णालयांनी अग्नीसुरक्षेचे नियम पाळवेत’ सर्वोच्च न्यायालयाची सूचना

राजकोट – गुजरातच्या राजकोट येथील कोविड सेंटर असलेल्या उदय शिवानंद रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत पाच रुग्णांचा बळी गेला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबद्दल तिव्र दु:ख व्यक्त केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही या दुर्देवी अपघाताची दखल घेत अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अत्मपरिक्षणाची आवश्‍यकता असल्याचे म्हटले आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात अहमदाबादमधील एका कोवीड रुग्णालयाला लागलेल्या आगीत आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

शुक्रवारी सकाळी उदय शिवानंद रुग्णालयात आग लागली. हे रुग्णालय विशेष कोविड सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. रुग्णालयात कोरोनाचे 33 रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांचा आगीत बळी गेला. अतिदक्षता विभागातूनच आगीला सुरुवात झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. 28 रुग्णांची या आगीतून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या रुग्णांना दुसऱ्या कोविड रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. आगीवर अग्नीशामकदलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले. मात्र या आगीचे निच्छित कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेतली आहे. अशा घटना वारंवार घडत असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आली नसल्याचे दिसत आहे, अशी टिप्पणी केली आहे. याबाबत आता आत्मपरिक्षणाची गरज आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच या घटनेबाबत गुजरात सरकारकडून अहवाल मागविला आहे. याशिवाय देशभरातील रुग्णालयात अग्नी सुरक्षा यंत्रणेची अंमलबजावणी व्हावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे.

याआधी ऑगस्ट महिन्यात गुजरातच्याच अहमदाबादमध्ये झालेल्या अशाच एका दुर्घटनेत आठ जणांचा बळी गेला होता. तसेच मुंबईल मुलुंड येथे ऑक्टोबर महिन्यात एका कोविड सेंटररला आग लागली होती. यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या 82 वर्षिय कोरोना रुग्ण दगावला होता. तसेच सप्टेंबर महिन्यात ओडिशाच्या जगतपूरमध्ये एका कोविड रुग्णालयाला आग लागली होती. यावेळी 127 रुग्ण या रुग्णालयात भरती होती. यातील 40 जण अतिदक्षता विभागात भरती होते.

leave a reply