नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात पाच जवानांचा बळी

अबूजा – ‘आयएस’ संलग्न बोको हरामच्या दहशतवाद्यांनी नायजेरियाच्या बोर्नो भागात चढविलेल्या हल्ल्यात पाच जवानांचा बळी गेला. नायजेरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी लष्करी अधिकार्‍यांसह या भागाची पाहणी केल्यानंतर दुसर्‍या दिवशी पुन्हा या भागात हल्ला झाला. गेल्या आठवड्यात बोर्नो येथील हल्ल्यानंतर सुमारे ६५ हजार जणांनी स्थलांतर केले होते.

नायजेरिया आणि नायजरच्या सीमेजवळील बोर्नो प्रांत बोको हरामच्या दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरत आहे. गेल्या आठवड्याभरात या दहशतवादी संघटनेने तीन वेळा बोर्नोवर हल्ले चढविले आहेत. आठवड्याभरापूर्वी झालेल्या हल्ल्यात १८ स्थानिकांचा बळी गेला होता. बोको हरामच्या दहशतवाद्यांच्या हत्याकांडामुळे भेदरलेल्या हजारो जणांनी नायजरच्या दिशेने स्थलांतर केले होते. त्यानंतर या भागात सुरक्षेसाठी तैनात जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला.

या हल्ल्यात पाच जवानांचा बळी गेला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला घाबरुन ९० हून अधिक जवानांनी पलायन केले होते. यापैकी ४१ जवान परतले असून अद्याप ५८ जवान बेपत्ता आहेत. यानंतर रविवारी नायजेरियाचे संरक्षणमंत्री बशीर मगाजी यांनी दिक्वा भागाला भेट दिली. मगाजी यांनी लष्करी अधिकार्‍यांसोबत दिक्वा सोडल्यानंतर रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मोटारीतून आलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा येथील लष्करावर हल्ले चढविले.

leave a reply