नायजरमधील दहशतवादी हल्ल्यात १९ जणांचा बळी

नायमी – नायजरच्या पश्‍चिमेकडील टिल्लाबेरी भागात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १९ जणांचा बळी गेला. येथील एका दफनविधीवेळी दहशतवाद्यांनी हा हल्ला चढविला. नायजर, माली आणि बुर्किना फासो या देशांच्या सीमेवर अस्थैर्य निर्माण करणारी ‘आयएस’संलग्न दहशतवादी संघटना या हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचा दावा केला जातो.

मोटारसायकलवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी मालीच्या सीमेजवळ असलेल्या टिल्लाबेरी प्रांतातील गॅगोरॉ गावात हल्ला चढविला. स्थानिकाच्या दफनविधीसाठी जमलेल्या जमावावर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. नायजरच्या राष्ट्राध्यक्षांनी या भ्याड हल्ल्यावर टीका केली असून संरक्षणमंत्री आणि अंतर्गत सुरक्षामंत्र्यांना टिल्लाबेरीसाठी रवाना केले आहे. जानेवारी महिन्यापासून टिल्लाबेरी प्रांत ‘आयएस’संलग्न दहशतवाद्यांच्या हल्ल्यांचे केंद्र ठरले आहे.

जानेवारी महिन्यात दहशतवाद्यांनी टिल्लाबेरीमध्ये चढविलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १०० जणांचा बळी गेला होता. तर त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातील हल्ल्यांमध्ये २३७ जण ठार झाले होते. ‘आयएस’संलग्न दहशतवाद्यांबरोबरच कट्टरपंथियांच्या स्थानिक टोळ्याही नायजर-मालीच्या सीमेजवळ कार्यरत आहेत. काही घटनांमध्ये या टोळ्यांनी हल्ले चढविल्याचे समोर आले होते. या कट्टरपंथियांच्या टोळ्या अल्पसंख्यांकांना लक्ष्य करीत असल्याची टीका झाली होती.

टिल्लाबेरी प्रांत कृषी, पशूपालन, मासेमारी त्याचबरोबर खनिजसंपत्तीसाठी ओळखला जातो. नायजरमधील आघाडीचे गव्हाचे उत्पादन करणारा प्रांत म्हणून टिल्लाबेरीचा उल्लेख केला जातो. याशिवाय सोनं आणि लोहधातूचा मोठा साठा आहे. २००४ साली येथील तिरा भागात कॅनडाच्या कंपनीने सोन्याचे उत्खनन सुरू केले.

काही दिवसांपूर्वीच मोहम्मद बझूम यांनी नायजरची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यानंतर नायजरमध्ये झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला ठरतो.

leave a reply