रशियातील अमेरिकेचे राजदूत मायदेशी परतणार

मॉस्को – अमेरिकेचे रशियातील राजदूत जॉन सुलिवन लवकरच मायदेशी परणार आहेत. रशियाने अमेरिकेच्या दहा राजनैतिक अधिकार्‍यांच्या हकालपट्टीचे आदेश दिले होते. मात्र राजदूत सुलिवन यांच्यावर तशी कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ त्यांनी सल्लामसलतीसाठी मायदेशी जावे, असे सुचविण्यात आले होते, असा दावा रशियाने केला आहे. आधीच्या काळात हा सल्ला अमान्य करणार्‍या सुलिवन यांनी आता मात्र आपण अमेरिकेला परतणार असल्याचे जाहीर केले. सध्या अमेरिका व रशियामध्ये राजनैतिक पातळीवरचा संघर्ष तीव्र होत असताना, अमेरिकन राजदूत रशियामधून मायदेशी चालले आहेत, ही लक्षवेधी घटना ठरते.

अमेरिकेवर सायबर हल्ले तसेच अमेरिकेच्या निवडणुकीतील हस्तक्षेप करण्याचे आरोप ठेवून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियाच्या दहा राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली होती. तसेच रशियावर इतर काही निर्बंध लादले होते. अपेक्षेनुसार रशियानेही अमेरिकेच्या दहा राजनैतिक अधिकार्‍यांची आपल्या देशातून हकालपट्टी करून त्याला प्रत्युत्तर दिले.

रशियाने तसा निर्णय घेण्याच्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. यावेळी बायडेन यांनी पुतिन यांना चर्चेचा प्रस्तव दिला होता. तरीही रशियाने अमेरिकन राजनैतिक अधिकार्‍यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला होता. पण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दिलेला चर्चेचा प्रस्ताव रशियाच्या विचाराधीन असल्याचे संकेत मिळत आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात राजदूत जॉन सुलिवन रशियात राजदूत म्हणून काम पाहत होते. अमेरिकेत सत्ताबदल होऊन बायडेन यांचे प्रशासन आल्यानंतरही सुलिवन यांचीच राजदूत म्हणून नियुक्ती कायम ठेवण्यात आली होती.

मात्र दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकार्‍यांना आपल्या देशाबाहेर काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर, सुलिवन यांनी सल्लामसलतीसाठी मायदेशी परतावे, असे रशियाकडून सुचविण्यात आले होते. त्याला सुलिवन यांनी नकार दिला. रशियन राष्ट्राध्यक्षांना मी रशियात नको असेन, तर त्यांनी तशी कारवाई करावी, असे सुलिवन यांनी म्हटले होते.

पण आता सुलिवन लवकरच मायदेशी परतणार आहेत. अमेरिकेच्या नव्या प्रशासनाशी थेट चर्चा करण्याची संधी आत्तापर्यंत सुलिवन यांना मिळाली नव्हती. त्यासाठी त्यांना मायदेशी बोलावले जात असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. रशियाकडूनही तशाच स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र दोन्ही देशांमध्ये लवकरच राष्ट्राध्यक्षांच्या पातळीवर चर्चा अपेक्षित असून त्याची तयारी करण्यासाठी राजदूत सुलिवन अमेरिकेला चालले असावे, असे दावेही समोर येत आहेत.

एकमेकांच्या राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली असली, तर अमेरिका व रशियालाही हा वाद चिघळविण्यात स्वारस्य नाही. विशेषतः बायडेन यांच्या प्रशासनाने तसे संकेतही दिले होते. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची खूनी म्हणून संभावना केल्यानंतरही, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दाखविली आहे, ही बाब हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी ठरते, असे अमेरिकन विश्‍लेषक सांगत आहेत.

विशेषतः बायडेन यांचे प्रशासन चीनच्या विरोधात भूमिका स्वीकारत असताना, राष्ट्राध्यक्ष बायडेन रशियाच्या विरोधात अतिआक्रमकता दाखवू शकत नाही, याकडे हे विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

 

leave a reply