चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात अमेरिका व जपानचा लष्करी सराव

लष्करी सरावटोकिओ/वॉशिंग्टन – ‘अमेरिका व जपानमध्ये सुरू झालेला संयुक्त सराव फक्त या दोन देशांच्या लष्कराला आत्मविश्‍वास देणारा नसून या क्षेत्रातील आमच्या सर्व सहकारी व भागीदार देशांना बळकट करणारा आहे. या भागात कोणीही शत्रू म्हणून उभा ठाकला तर सर्व देश त्याविरोधात ठामपणे उभे राहून मुकाबला करु शकतो’, या शब्दात अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट कर्नल नील बेरी यांनी जपानबरोबर सुरू झालेल्या लष्करी सरावाची माहिती दिली. साऊथ चायना सीबरोबरच ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात चीनकडून सातत्याने आक्रमक कारवाया सुरू आहेत. चीनच्या या आक्रमकतेला रोखण्यासाठी अमेरिका व जपानने एकाच वेळी दोन लष्करी सराव सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

लष्करी सरावगेल्या आठवड्यात अमेरिका व जपानदरम्यान ‘यामा सकुरा’ लष्करी सराव सुरू झाला असून त्यात पाच हजार जवान सहभागी झाले आहेत. कुमामोटो भागात सुरू झालेल्या या सरावात जपानच्या चार हजार तर अमेरिकेच्या एक हजार जवानांचा समावेश आहे. हा सराव 15 डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. ‘जॉर्इंट कमांड पोस्ट’ प्रकारातील हा सराव दोन देशांमध्ये होणाऱ्या सर्वात मोठ्या व महत्त्वाच्या सरावांपैकी एक आहे. हा सराव 1982 सालापासून आयोजित करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘यामा सकुरा’पाठोपाठ सोमवारी निगाटा व गुन्मा भागात ‘फॉरेस्ट लाईट’ हा द्विपक्षीय सराव सुरू झाला आहे. या सरावात दोन्ही देशांचे सुमारे एक हजार जवान सहभागी झाले असून त्यात 500 युएस मरिन्सचा समावेश आहे. या जवानांबरोबरच ‘एमव्ही-22 ऑस्प्रे टिल्ट्रोटर्स’ व ‘सीएच-47’ ही लष्करी हेलिकॉप्टर्सही सरावाचा भाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लष्करी सराव

जपाननजिकच्या क्षेत्रातील एका बेटावर शत्रूकडून अचानक झालेल्या हल्ल्याचा मुकाबला करणे हे दोन्ही सरावांचे मध्यवर्ती सूत्र असल्याचे जपानच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्र खुले व मुक्त राखण्यासाठी संयुक्त मोहिमांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे’, या शब्दात जपानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल ऱ्योजी ताकेमोटो यांनी सरावांचे समर्थन केले.

गेल्या काही वर्षात चीनने साऊथ चायना सी बरोबरच जपाननजिक असलेल्या ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रावर ताबा मिळविण्यासाठी जोरदार कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या काही महिन्यात चीनने आपल्या युद्धनौका, पाणबुड्या व लढाऊ विमानांच्या सहाय्याने ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रात सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न केले होते. जपानविरोधात दबावतंत्र वापरून सार्वभौमत्त्वाला थेट आव्हान देण्याची महत्त्वाकांक्षा यामागे असल्याचे दावे विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहेत. चीनच्या या वर्चस्ववादाला आव्हान देण्यासाठी अमेरिका व जपानने लष्करी सहकार्याची व्याप्ती वाढविली असून एकाच वेळी दोन सरावांचे आयोजन त्याचाच भाग ठरतो.

leave a reply