इराणच्या नातांझमधील स्फोटात पाच हजार सेंट्रिफ्युजेस निकामी

- अमेरिकी अभ्यासगटाचा दावा

वॉशिंग्टन – दोन आठवड्यांपूर्वी नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या शक्तीशाली स्फोटात विशेष नुकसान झाले नसल्याचा दावा इराण करीत आहे. पण या स्फोटामध्ये नातांझ प्रकल्पातील सुमारे पाच हजार सेंट्रिफ्युजेस निकामी झाल्याचा दावा अमेरिकी अभ्यासगटाने केला आहे. यामुळे इराणचा अणुकार्यक्रम किमान दोन महिन्यांसाठी पिछाडीवर गेल्याचेही अमेरिकी अभ्यासगटाने म्हटले आहे. तरीही इराणने युरेनियमचे वाढविलेले संवर्धन धोकादायक असल्याचा इशारा या अभ्यासगटाने दिला आहे.

११ एप्रिलच्या रविवारी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात स्फोट झाला होता. सुरुवातीला वीजसयंत्रातील बिघाडामुळे येथे ब्लॅकआऊट झाल्याचे इराणने माध्यमांसमोर सांगितले होते. पण पुढच्या चोवीस तासातच इराणच्या अधिकार्‍यांनी हा आण्विक दहशतवाद असल्याचा आरोप करून इस्रायलला दोषी धरले होते. नातांझमध्ये झालेल्या या स्फोटात इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रवक्ते बेहरोज कमालवंदी हे देखील जखमी झाल्याचे व्हिडिओ व फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते.

यानंतरही इराणच्या नेत्यांनी सदर स्फोटात अणुप्रकल्पाचे विशेष नुकसान झाले नसल्याचा दावा केला होता. तसेच सदर प्रकल्पाचा व्हिडिओ प्रसिद्ध करून येथील युरेनियमचे संवर्धन व नवे सेंट्रिफ्युजेस बसविणे सुरळीत सुरू असल्याचे इराणने पटवून दिले होते. याशिवाय अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंत नेल्याचे आणि एक हजार प्रगत सेंट्रिफ्युजेस बसविल्याची घोषणा इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केली होती. पण व्हिएन्ना येथील वाटाघाटीत अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी ही घोषणा केली होती, असा दावा अमेरिकी अभ्यासगटाने केला आहे.

‘ज्यूईश इन्स्टिट्युट फॉर दी नॅशनल सिक्युरिटी ऑफ अमेरिका’ (जेआयएनएसए) या अमेरिकास्थित अभ्यासगटाने तयार केलेल्या अहवालात नातांझ अणुप्रकल्पातील स्फोटात इराणचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. इराणने नातांझच्या आवारात दोन भुयारी प्रकल्प तयार केले आहेत. यापैकी ‘हॉल ए’मध्ये ‘आयआर-१’ प्रकारातील हजारो सेंट्रिफ्युजेसवर काम सुरू होते. तर ‘हॉल बी’मध्ये संख्येने फार कमी असलेल्या पण प्रगत अशा ‘आयआर-२एम’, ‘आयआर-४’, ‘आयआर-५’ आणि ‘आयआर-६’ या सेंट्रिफ्युजेसचा समावेश आहे.

आकाराने मोठ्या असलेल्या ‘हॉल ए’ प्रकल्पात दोन आठवड्यांपूर्वी मोठा स्फोट झाला व यामध्ये येथील ५० टक्के संवर्धित सेंट्रिफ्युजेस पूर्णपणे नष्ट झाले. या सेंट्रिफ्युजेसची संख्या पाच हजारापर्यंत असण्याची शक्यता असल्याचे अमेरिकी अभ्यासगटाच्या परराष्ट्र धोरणाचे संचालक जोनॅथन रूहे यांचे म्हणणे आहे. यामुळे इराणचा अणुकार्यक्रम दोन महिन्यांसाठी मागे गेल्याचे ब्लेझ मिस्झल यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

पण इराणने ‘आयआर-८’ व ‘आयआर-९’ या अतिप्रगत सेंट्रिफ्युजेस सुरू केलेले काम ‘आयआर-१’च्या नुकसानाची भरपाई करू शकतात. यासाठी काही काळ लागू शकतो. पण नातांझ स्फोटानंतरही इराणचा अणुकार्यक्रम तितकाच धोकादायक असल्याचा इशारा अमेरिकी अभ्यासगटाचे विश्‍लेषक देत आहेत.

leave a reply