आफ्रिकेतील चीनच्या धोक्याकडे अमेरिकेने दुर्लक्ष करू नये

- अमेरिकेच्या आफ्रिका कमांडच्या प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – चीनने जिबौतीमधील आपल्या लष्करी तळाचा विस्तार केला आहे. याशिवाय आफ्रिकेतील चीनची लष्करी तसेच आर्थिक गुंतवणूक वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत, आफ्रिकेतील चीनच्या वाढत्या धोक्याकडे दुर्लक्ष करणे अमेरिकेला परवडणारे नाही, असा इशारा अमेरिकेच्या आफ्रिका कमांडचे प्रमुख जनरल स्टिफन टाऊनसेंड यांनी दिला. त्याचबरोबर अमेरिकेने सोमालियातून सैन्यमाघारीमुळे या देशातील दहशतवादविरोधी कारवाईवर परिणाम झाल्याची टीका जनरल टाऊनसेंड यांनी केली.

आफ्रिका कमांड किंवा आफ्रिकॉमचे प्रमुख जनरल टाऊनसेंड यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना, या खंडाकडे अमेरिकेने दुर्लक्ष करू नये, असे आवाहन केले. ‘चीन आणि रशिया आफ्रिकेकडे दुर्लक्ष करीत नाहीत व ही एकच गोष्ट याचे महत्त्व सांगण्यासाठी पुरेशी ठरावी’, असे जनरल टाऊनसेंड यांनी म्हटले आहे. आर्थिकदृष्ट्या आफ्रिकेतील गुंतवणूक अमेरिकेसाठी किती महत्त्वाची ठरू शकते, याचे संदर्भ जनरल टाऊनसेंड यांनी या मुलाखतीत दिले.

आफ्रिकेमध्ये एकूण ५४ देश आहेत. जगातील वेगाने आर्थिक विकास करणार्‍या २५ देशांपैकी १३ देश आफ्रिका खंडातील आहेत, याची आठवण जनरल टाऊनसेंड यांनी करून दिली. सध्या संपूर्ण जग हवामान बदलाचा सामना करीत आहे. अशावेळी जगापैकी एकूण ६० टक्के सुपीक जमीन आफ्रिकेमध्ये आहे. त्याचबरोबर कोबाल्ट, क्रोमियम, टँटलम आणि यासारख्या अतिशय महत्त्वांच्या धातूंचा साठा आफ्रिकेमध्ये आहे. त्यामुळे आफ्रिकी देशांमधील गुंतवणूक अमेरिकेसाठी फायद्याचे ठरू शकते, याची माहिती जनरल टाऊनसेंड यांनी दिली.

तर व्यापारी वाहतूकीच्या दृष्टीनेही आफ्रिकेचे महत्त्व वाढले आहे. यासाठी जनरल टाऊनसेंड यांनी काही आठवड्यांपूर्वी सुएझ कालव्यात घडलेल्या घटनेचा दाखला दिला. सुएझ कालव्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारी वाहतुकीची कोंडी करणारे महत्त्वाचे आणखी तीन सागरी क्षेत्र आफ्रिकेशी जोडलेले आहेत. यामध्ये जिबौती आणि येमेनमधील बाब अल-मन्देबचे आखात, इटलीच्या सिसीली आणि लिबियातील सागरी क्षेत्र व जिब्राल्टरचे आखात यांचा समावेश असल्याची माहिती आफ्रिकॉमच्या प्रमुखांनी दिली.

त्यामुळे सुरक्षित आंतरराष्ट्रीय व्यापारी वाहतूकीसाठी आफ्रिकेमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ असणे आवश्यक असल्याचे जनरल टाऊनसेंड म्हणाले. गेल्या वर्षीपर्यंत आफ्रिकेतील फक्त १५ देशांमध्ये अमेरिकेचे २९ लष्करी तळ होते. यातील एकट्या सोमालियातील पाच तळांचा समावेश होता. या व्यतिरिक्त ट्युनिशिया, नायजर, माली, केनिया, कॅमेरून आणि लिबियामध्येही अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. पण यावर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने सोमालियातून सैन्यमाघार घेतली होती. याचा सर्वात मोठा परिणाम सोमालियातील अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील कारवाईवर झाल्याचा दावा जनरल टाऊनसेंड करीत आहेत.

तर याउलट चीनने आफ्रिकेतील आपल्या लष्करी कमांडमध्ये मोठी वाढ व त्यांचा विस्तार केला आहे. जिबौतील चीनच्या लष्करी तळाचा विस्तार झाल्याचे जनरल टाऊनसेंड यांनी नमूद केले. याशिवाय आफ्रिकेतील पूर्वेकडील देशांमध्ये चीन आपले लष्करी, नौदल तळ उभारत चालला आहे.

सदर लष्करी, नौदल तळ आपले ‘फिफ्थ आयलँड चेन’ असल्याचे चीनने घोषित केले आहे, याकडे जनरल टाऊनसेंड यांनी लक्ष वेधले. अशा परिस्थितीत, आफ्रिकेकडे दुर्लक्ष करणे अमेरिकेच्या हिताचे नसेल, असे आफ्रिकॉमच्या प्रमुखांनी बजावले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून पूर्ण माघारीची घोषणा केली. बायडेन प्रशासन आफ्रिकेबाबतही असाच निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. या पार्श्‍वभूमीवर, आफ्रिकॉमच्या प्रमुखांनी बायडेन प्रशासनाला हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply