अमेरिकी हवाईहद्दीतील उडत्या वस्तूंचा परग्रहवासियांशी संबंध असण्याची शक्यता

- ‘एरोस्पेस डिफेन्स कमांड’चे प्रमुख जनरल ग्लेन वॅनहर्क

वॉशिंग्टन – अमेरिका व कॅनडाच्या हवाईहद्दीत गेल्या 72 तासांच्या अवधीत आढळलेल्या उडत्या वस्तूंचा (अनआयडेंटिफाईड् हाय-अल्टिट्यूड ऑब्जेक्टस्‌‍) परग्रहवासियांशी संबंध असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही, असा दावा अमेरिकेच्या हवाईदलातील वरिष्ठ अधिकारी जनरल ग्लेन वॅनहर्क यांनी केले. रविवारी अमेरिकेच्या हवाईदलाने मिशिगन प्रांतातील ‘लेक हुरॉन’ भागात तिसरे ‘युएचएओ’(अनआयडेंटिफाईड् हाय-अल्टिट्यूड ऑब्जेक्ट) पाडल्याची माहिती दिली. अवघ्या तीन दिवसात तीन ‘युएचएओ’ज्‌‍ आढळल्याने अमेरिकी जनता व माध्यमांमध्ये परग्रहवासियांच्या हालचालींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अमेरिकेतील वरिष्ठ सिनेटर मार्को रुबिओ यांनी, गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या हद्दीत ‘युएफओ’(उडत्या तबकड्या) आढळत असून संरक्षण विभाग आता त्याची दखल घेत आहे, असा ठपका ठेवला.

शनिवारी कॅनडातील युकॉन प्रांताच्या हद्दीत आढळलेले ‘युएचएओ’ अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशांनी केलेल्या संयुक्त कारवाईत लक्ष्य करण्यात आले होते. या मोहिमेच्या वेळेस अजून एक ‘युएचएओ’ अमेरिकेच्या हवाईद्दीत असल्याचे दावे करण्यात आले होते. त्यामुळे अमेरिकेच्या हवाईदलाने सुरुवातीला मोंटाना व त्यानंतर मिशिगन प्रांतातील हवाईहद्दीत प्रतिबंध लागू केले होते. शोधमोहिम सुरू असताना मिशिगन प्रांतातील ‘लेक हुरॉन’ भागात ‘युएचएओ’ घिरट्या घालत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ते पाडण्याचे आदेश दिले. ‘एफ-16’ या लढाऊ विमानातून क्षेपणास्त्र डागून ‘युएचएओ’ नष्ट करण्यात आल्याची माहिती युएस एरोस्पेस कमांड ‘नोराड’ने दिली.

पाडण्यात आलेले ‘युएचएओ’ अष्टकोनी आकाराचे असून त्याचे अवशेष शोधण्याची मोहीम सुरु असल्याचे ‘नोराड’ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले. एकापाठोपाठ एक असे तीन ‘युएचएओ’ज्‌‍ हवाईहद्दीत आढळल्यानंतर अमेरिकी जनता, माध्यमे व राजकीय वर्तुळात परग्रहवासियांच्या मुद्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या संसद सदस्यांनी या संपूर्ण प्रकरणाची संसदेला माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अमेरिकेतील सोशल मीडियावर सदर घटनांचे परग्रहवासियांशी संबंध असल्याचे दावे करणाऱ्या पोस्टस्‌‍ मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत. याच पार्श्वभूमीवर हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे परग्रहवासियांच्या मुद्याने अधिकच जोर पकडला आहे.

‘हवाईहद्दीत पाडण्यात आलेल्या वस्तूंचे मूळ व इतर माहिती शोधण्याचे काम अमेरिकी गुप्तचर यंत्रणा पार पाडतील. मात्र त्यासंदर्भात कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही. यात परग्रहवासियांशी निगडीत असण्याच्या शक्यतेचादेखील समावेश असू शकतो. सध्याच्या घडीला आम्ही अमेरिकेला असलेल्या तसेच संभाव्य अशा प्रत्येक धोक्याचा विचार करीत आहोत’, असे हवाईदलातील वरिष्ठ अधिकारी जनरल ग्लेन वॅनहर्क यांनी सांगितले जनरल वॅनहर्क हे अमेरिकेच्या ‘नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड व नॉर्दर्न कमांड’चे प्रमुख आहेत.

गेल्याच महिन्यात अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ व संरक्षण विभागाने, परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांशी संबंधित घटनांचा अहवाल संसदेला सादर केला होता. त्यात, अमेरिकेत उडत्या तबकड्यांशी संबंधित 500हून अधिक घटनांची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली होती.

माझे काही परग्रहवासिय मित्र भेटण्यासाठी आले आहेत – ‘युएचएओ’ज्‌‍च्या घटनांवर उद्योजक एलॉन मस्क यांची प्रतिक्रिया

वॉशिंग्टन – अमेरिका व कॅनडाच्या हद्दीत एकामागोमाग पाडण्यात आलेल्या ‘युएचएओ’ज्‌‍च्या(अनआयडेंटिफाईड् हाय-अल्टिट्यूड ऑब्जेक्ट) घटनांवर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी याचा संबंध परग्रहवासियांशी जोडला आहे. अशातच खाजगी अंतराळ कंपनी ‘स्पेसेक्स’चे संस्थापक एलॉन मस्क यांची खोचक प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणारी ठरली.

‘घाबरु नका. माझे काही परग्रहवासिय मित्र भेट देण्यासाठी आले आहेत’, अशी पोस्ट मस्क यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. मंगळावरील मानवी वस्तीबाबत आग्रही भूमिका मांडणाऱ्या मस्क यांच्या या पोस्टमुळे परग्रहवासियांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याचे संकेत मिळाले आहेत. मस्क यांनी यापूर्वीही परग्रहवासियांबाबत वेगवेगळी वक्तव्ये करून जगाचे लक्ष वेधून घेतले होते.

leave a reply