अमेरिकेच्या भारतासाठी उपलब्ध नसताना भारत-रशियामध्ये भागीदारी विकसित झाली

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन

वॉशिंग्टन – काही दशकांपूर्वी अमेरिका भारताचा भागीदार बनण्यासाठी उत्सुक नव्हता. त्यावेळी भारत व रशियामधील भागीदारी विकसित झाली होती, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केला आहे. अमेरिकेच्या संसदीय समितीसमोर झालेल्या सुनावणीत ही माहिती देतानाच अमेरिकेची भारताबरोबरील भागीदारी ही भविष्यात सर्वात महत्त्वाची ठरेल व अमेरिका त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा दावाही परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी केला. रशियाबरोबरील सहकार्यावरून बायडेन प्रशासन भारतावरील दबाव वाढवित आहे. त्याविरोधात अमेरिकेतूनच इशारे येत असताना, परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांना भारताबाबत हा खुलासा द्यावा लागत असल्याचे दिसते.

भागीदारी विकसितगेल्या काही वर्षात भारत व अमेरिकेमध्ये संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमधील सहकार्य दृढ होत आहे. मात्र अमेरिकेबरोबरील सहकार्याची व्याप्ती वाढत असताना भारताने रशियाची साथ सोडलेली नाही व मैत्री कायम राखण्याची ग्वाहीदेखील दिली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही बाब ठळकपणे अधोरेखित होताना दिसत आहे. भारताने रशियाबरोबरील संरक्षण, इंधन तसेच व्यापारविषयक सहकार्य कायम ठेवले आहे. ही बाब अमेरिकेला खटकत असून गेल्या महिन्याभरात अमेरिका भारताला सातत्याने धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व्हिक्टोरिया नुलँड व उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलिप सिंग यांनी भारताला भेट देऊन दडपण वाढविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ‘टू प्लस टू’ चर्चेच्या माध्यमातूनही अमेरिकेच्या वरिष्ठ मंत्र्यांकडून भारताला कडक शब्दात समज देण्याचा प्रयत्न झाला. पण या सर्व धमाकावणीकडे दुर्लक्ष करीत भारताने आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे वारंवार स्पष्ट केले. अमेरिकेच्या दबावासमोर झुकून भारत रशियाबरोबरील सहकार्य तोडणार नसल्याचा रोखठोक संदेश भारतीय नेतृत्त्वाने दिला. त्यामुळे आता अमेरिकेला भारत-रशिया व भारत-अमेरिका यांच्या संबंधांमध्ये असलेल्या फरकावर खुलासा द्यावा लागत आहे. परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी संसदेच्या समितीसमोर दिलेल्या उत्तरात, अमेरिका व भारतामधील भागीदारी पुढील काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात विकसित होईल, असा विश्वास व्यक्त केला.

leave a reply