सलग दुसऱ्या महिन्यातही भारताने रशियाकडून सर्वाधिक प्रमाणात इंधनतेल खरेदी केले

नवी दिल्ली – सलग दुसऱ्या महिन्यात इराक व सौदी अरेबियाला मागे टाकून रशिया भारताला सर्वाधिक प्रमाणात इंधनाचा पुरवठा करणारा देश ठरला. इंधनाच्या वाहतुकीची नोंद करणाऱ्या ‘र्व्होटेक्सा’ नावाच्या संस्थेने याची माहिती दिली. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात भारताला सर्वाधिक प्र्रमाणात इंधनतेलाचा पुरवठा करणाऱ्या रशियाकडून 31 मार्च 2022 च्या आधी भारत आपल्या मागणीच्या केवळ 0.2 टक्के इतकेच इंधनतेल खरेदी करीत होता. पण युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर, रशियाने भारताला सवलतीच्या दरात इंधन पुरविण्याचा प्रस्ताव दिला आणि याचा लाभ घेऊन भारताने रशियाकडून इंधनतेलाची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढविली होती. दरम्यान, जी7 देशांनी रशियाच्या इंधनवर लावलेल्या मर्यादेचे पालन न करण्याच्या भारताच्या निर्णयाचे रशियाने स्वागत केले आहे.

FILES-US-ECONOMY-ENERGYव्होर्टेक्साने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात भारताने इराककडून सुमारे 8,61,461 बॅरल्स प्रतिदिन तर सौदी अरेबियाकडून 5,70,922 बॅरल्स प्रतिदिन इतके इंधनतेल खरेदी केले होत. तर या यादीत अमेरिका चौथ्या क्रमांकावर असून नोव्हेंबर महिन्यात भारताने अमेरिकेकडून सुमारे 4,05,525 बॅरल्स प्रतिदिन इतके इंधनतेल खरेदी केले. मात्र याच नोव्हेंबर महिन्यात भारताने रशियाकडून 9,09,403 बॅरल्स प्रतिदिन इतके इंधनतेल खरेदी केलेले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यानंतर, नोव्हेंबरमध्येही रशिया हा भारताला सर्वाधिक प्र्रमाणात इंधनतेलाचा पुरवठा करणारा देश ठरला. 2022 च्या मार्च महिन्यापूर्वी मागणीच्या अवघे 0.2 टक्के इतकेच रशियाकडून इंधनतेल खरेदी करणाऱ्या भारताने रशियाकडून इतक्या प्रचंड प्रमाणात इंधनाची खरेदी सुरू केली, ही बाब लक्षणीय ठरते.

युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर अमेरिका व युरोपिय देशांनी रशियाच्या इंधन निर्यातीला लक्ष्य केले होते. त्याला काटशह देण्यासाठी रशियाने भारताला सवलतीच्या दरात इंधनतेल पुरविण्याचा अत्यंत आकर्षक प्रस्ताव दिला. याचा लाभ घेऊन भारतीय इंधनकंपन्यांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधनतेलाची खरेदी सुरू केली. इराक व सौदी अरेबिया या आखाती देशांना मागे टाकून आता रशिया भारताला सर्वाधिक प्रमाणात इंधनाचा पुरवठा करणारा देश बनला आहे. पुढच्या काळात दोन्ही देशांमधील हा इंधनव्यवहार अधिकच वाढेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी करू नये, यासाठी अमेरिका व युरोपिय देशांनी दबाव टाकला होता. मात्र भारताने ठाम भूमिका स्वीकारून हा दबाव झुगारून दिला होता. इतकेच नाही तर इंधनाचे दर कडाडलेले असताना, भारत आपल्या जनतेसाठी स्वस्तात उपलब्ध असलेले इंधन खरेदी करीत राहिल, असे भारताने अमेरिका व युरोपला बजावले होते. संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देखील परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सरकार आपल्या इंधन कंपन्यांना अमुक एका देशाकडून इंधन खरेदी करा किंवा करू नका, अशी सूचना देत नाही, तर कमी दरात उपलब्ध असलेले इंधन खरेदी करा, अशी सूचना करीत असल्याचा खुलासा केला.

भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी करावी, मात्र जी7 देशांनी लादलेल्या ‘प्राईस कॅप’ अर्थात निश्चित केलेल्या दराच्या मर्यादेबाहेर जाऊन रशियाकडून इंधन खरेदी करू नये, अशी मागणी केली जात आहे. अमेरिका व युरोपिय देश यासाठी पुन्हा एकदा भारतावरील दडपण वाढवित आहेत. मात्र भारताने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. भारताने घेतलेल्या या निर्णयाचे रशियाने स्वागत केले आहे.

leave a reply