महाराष्ट्रातील 75 हजार कोटींच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण व पायाभरणी

PM inaugurateनागपूर – महाराष्ट्रातील सुमारे 75 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कमेच्या प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी’ महामार्गाचा समावेश आहे. नागपूरपासून शिर्डीपर्यंत 520 किलोमीटरपर्यंत पूर्ण झालेल्या या महामार्गाचे लोकार्पण करताना पंतप्रधानांनी राज्यातील 24 जिल्हे यामुळे अत्याधुनिक सेवांनी जोडले जातील, असे म्हटले आहे. या महामार्गामुळे रोजगाराला चालना मिळून शेतकरी, यात्रेकरू व उद्योगक्षेत्रालाही याचा फार मोठा लाभ मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. याबरोबरच महाराष्ट्राच्या विकासासाठी 11 ताऱ्यांचे महानक्षत्र उदयाला येत असल्याचे सांगून 11 महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाची नवी उंची गाठेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

PM inauguratesपंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी राज्यातील 11 प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये नागपूरमध्ये ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस-एम्स, नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वन हेल्थ-एनआयओ, सीआयपीईटी चंद्रपूर, नाग नदी प्रदूषण निर्मुलन, नागपूर-विलासपूर वंदे भारत एक्सप्रेस, इत्यादींचा समावेश आहे. हे 11 प्रकल्प महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास साधतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्याचवेळी पायाभूत सुविधांच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित करून पंतप्रधानांनी सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि त्यानंतरच्या काळात आखाती देशांच्या प्रगतीचा दाखला दिला. एकेकाळी गरीब असलेल्या या देशांनी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केले आणि त्यानंतर या देशांची भरभराट झाली, असे पंतप्रधान म्हणाले.

पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचा सर्वाधिक प्रमाणात लाभ भारताला घेता आला नव्हता. पण चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्त्व भारत करील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

leave a reply