पर्शियन आखातातील बेटांप्रकरणी इराणने चीनच्या राजदूताला समन्स बजावले

पर्शियन आखातातीलतेहरान – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आखाती देशांच्या दौऱ्यावर असताना पर्शियन आखातातील बेटांप्रकरणी केलेल्या विधानांवर इराणमधून प्रतिक्रिया आली आहे. ‘चीन आणि आखाती देशांनी आपल्या निवेदनात उल्लेख केलेली बेटे इराणची आहेत. याबाबत आत्ता किंवा यापुढे कधीही कुठल्याही देशाबरोबर वाटाघाटी होऊ शकत नाहीत’, असा इशारा इराणने दिला. त्याचबरोबर तेहरानमधील चीनच्या राजदूतांना या प्रकरणी समन्स बजावून राजनैतिक पातळीवर इराणने चीनला या प्रकरणी जाब विचारला आहे.

गेल्या आठवड्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी सौदीचा दौरा केला होता. यावेळी आखाती देशांबरोबरच्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी या क्षेत्रात शांती सहकार्य प्रस्थापित करण्याचे आवाहन करताना युएईचा विशेष उल्लेख केला होता. ‘ग्रेटर तुंब, लेसर तुंब आणि अबू मुसा या तीन बेटांच्या मुद्यावर शांतीपूर्ण तोडगा शोधण्यासाठी युएईने घेतलेल्या पुढाकाराला चीनचे समर्थन आहे. आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहून द्विपक्षीय वाटाघाटीद्वारे हा मुद्यावर तोडगा काढणे योग्य ठरते’, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले होते.

पर्शियन आखातातीलतर इराणने अणुकार्यक्रमाबाबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाला पूर्ण सहकार्य करावे, असे जिनपिंग यांनी सुचविले. चीनने आखाती देशांच्या बैठकीत हे दोन्ही मुद्दे मांडल्यामुळे इराणने नाराजी व्यक्त केली. पर्शियन आखातातील ग्रेटर तुंब, लेसर तुंब आणि अबू मुसा या तीनही बेटांवर इराणने आपला अधिकार सांगितला आहे. 1971 सालापासून इराणने या बेटांवर प्रशासकीय व्यवस्था प्रस्थापित केली आहे. ही तीनही सार्वभौम बेटे इराणचा हिस्सा असून याबाबत आंतरराष्ट्रीय संघटनेचे सल्ले, करार किंवा नियम लागू पडत नाहीत. त्यामुळे कुठल्याही देशाबरोबर वाटाघाटी शक्य नसल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावले.

इराणच्या शेजारी देशांनी या बेटांवर अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला मजबूत, कठोर उत्तर दिले जाईल, असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिर अब्दुल्लाहियान यांनी दिला. तर अणुकार्यक्रमाच्या मुद्यावर इराण अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना परवानगी देणार नसल्याचे सांगून इराणने चीनचा हा प्रस्तावही धुडकावला.

leave a reply