म्यानमारच्या निवडणुकीत ‘स्यू की’ यांच्या पक्षाला आघाडी

'स्यू की'यंगून – म्यानमारच्या निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या ‘अँग सॅन स्यू की ‘ यांचा ‘नॅशनल लीग फॉर डेमोक्रॉसी’ (एनएलडी) पक्ष मोठ्या विजयाच्या दिशेने प्रवास करीत आहे. निवडणूक निकाल अजून जाहीर झाले नसले, तरी मतमोजणीत या पक्षाला मोठी आघाडी मिळली आहे. बहुमतापेक्षा कितीतरी जास्त जागा आपला पक्ष जिंकेल असा दावा, ‘एनएलडी’तर्फे करण्यात आला आहे. ५० वर्षांची लष्करी राजवट संपल्यानंतर म्यानमारमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. रोहिंग्यांवरील कारवाईवरून ‘स्यू की’ यांच्यावर जागतिक स्तरावर टीका झाली होती. यापार्श्वभूमीवर म्यानमारमधील हे निकाल महत्वाचे ठरतात.

'स्यू की'रविवारी म्यानमारमध्ये संसदीय निवडणुकीसाठी मतदान झाले. ९० हून अधिक राजकीय पक्षांनी या निवडणुकीत भाग घेतला आहे. कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळातही म्यानमारच्या जनतेने मतदानाला उस्फूर्त प्रतिसाद दिला होता. ६४२ जागांसाठी मतमोजणी सुरु झाली असून सत्ताधारी पक्ष ‘एनएलडी’ला ३७७ हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास ‘एनएलडी’ने व्यक्त केला. अद्याप संपूर्ण निकाल जाहीर झालेले नाहीत. लवकरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. पण त्याआधीच ‘एनएलडी’ने विजयोत्सव सुरु केला आहे. त्यांच्या समर्थकांनी तर रविवारी रात्रीपासूनच जल्लोष करायला सुरुवात केली आहे.

कोरोनाव्हायरस, आर्थिक संकट आणि वांशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर म्यानमारमध्ये निवडणूक पार पडली आहे. या संकटाच्या काळात म्यानमारच्या जनतेने ‘एनएलडी’वर विश्वास ठेवून त्यांना मत दिले असे सांगून ‘एनएलडी’च्या प्रवक्त्यांनी जनतेचे आभार मानले. २०१५ सालच्या निवडणुकीत स्यू की यांच्या पक्षाला विजय मिळाला होता. आणखी पाच वर्षे या पक्षाला मिळणार असल्यामुळे त्यांच्यासमोर अर्थव्यवस्था आणि अंतर्गत स्थैर्य हे दोन मुद्दे आहेत. कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देणे, हे आमचे पहिले प्राधान्य असेल असे ‘एनएलडी’च्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.'स्यू की'

दरम्यान, म्यानमारच्या सरकार समोर रोहिंग्याचे आव्हान कायम असणार असल्याचे विश्लेषकांनी म्हटले. म्यानमारने निवडणुकीत रोहिंग्यांना मतदानाचा हक्क दिला नसल्यामुळे मानवाधिकार संघटनांनी म्यानमार सरकारवर टीका केली होती. रोहिंग्या बंडखोरांचा प्रभाव असलेल्या भागात सुरक्षा कारणामुळे मतदान रद्द करण्यात आले होते. यामुळे सुमारे १० लाखांहून अधिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याचा दावा केला जातो. स्यू की यांच्या ‘एनएलडी’ पक्षाला लष्कराचा पाठिंबा असलेला ‘युनियन सॉलिडिटरी अँड डेव्हलपमेंट पक्षाकडून (यूएसडीपी) काही ठिकाणी आव्हान मिळत असून हा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. २०१५ च्या निवडणुकीतही ‘एनएलडी’नंतर यूएसडीपी पक्षाला दुसऱ्या क्रमांकांच्या जागा मिळाल्या होत्या.

leave a reply