केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ

नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्त्यात वाढ करत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. या निर्णयाचा 50 लाख कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळेल. महागाई भत्त्यामधील या वाढीने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवर गेला आहे. यावर्षाच्या जुलैपासून ही वाढ लागू होणार आहे.

central employeesसातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार जुलैपासूनची थकबाकीही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. महागाई भत्त्याध्ये वाढ करण्यात आल्याने सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 6,791.36 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

तसेच निवृत्तीधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार असल्याने वर्षाला 6,261.20 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार केंद्राला सोसावा लागेल. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांचा विचार करता एकूण 12 हजार 852 कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडणार आहे. सरकारने या वर्षी मार्चमध्ये डीएमध्ये 3 टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा एकूण डीए वाढून 34 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यानंतर आता डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने डीए 38 टक्के झाला आहे.

डीएमध्ये 4 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात 720 रुपयांची वाढ होईल. कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18 हजार रुपये असल्यास 34 टक्क्यांनूसार त्याला 6 हजार 120 रुपये डीए मिळेल. डीए 38 टक्के झाल्यावर कर्मचाऱ्यांना 6 हजार 840 रुपये महागाई भत्ता मिळेल.

दरम्यान, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर 2022-डिसेंबर 20022) मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहील.

leave a reply