इराणच्या रॉकेट प्रक्षेपणावर फ्रान्सची सडकून टीका

पॅरिस – तीन दिवसांपूर्वी इराणने इमाम खोमेनी अंतराळ केंद्रावरुन रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. याद्वारे आपले तीन उपग्रह अंतराळ सोडण्याचा प्रयत्न इराणने केला होता. पण इराणच्या या रॉकेट प्रक्षेपणावर फ्रान्सने जोरदार टीका केली आहे. व्हिएन्ना येथे अणुकरारावर महत्त्वाच्या वाटाघाटी सुरू असताना, रॉकेट प्रक्षेपण करून इराण आत्तापर्यंतच्या सर्व मेहनत वाया घालवित असल्याचे ताशेरे फ्रान्सने ओढले आहेत.

इराणच्या रॉकेट प्रक्षेपणावर फ्रान्सची सडकून टीकागुरुवारी इराणच्या अंतराळ संस्थेने रॉकेट प्रक्षेपित केले होते. इराणचे हे प्रक्षेपण यशस्वी ठरले. पण पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह स्थिरावण्यात अपयश मिळाल्याचे इराणने जाहीर केले होते. याआधीही इराणची अंतराळ मोहीम अपयशी ठरली होती. पण गुरुवारच्या या अंतराळ मोहिमेचा फ्रान्सने समाचार घेतला. इराणच्या अणुकराराबाबत प्रगती करण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांचे प्रयत्न सुरू असताना इराणचे हे रॉकेट प्रक्षेपण अत्यंत खेदजनक असल्याचे फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

या प्रक्षेपणासाठी इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केला जातो. व्हिएन्ना येथील चर्चा सुरू असताना इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करून आपल्याला अणुकराराची पर्वा नसल्याचे दाखवून दिल्याची टीका इस्रायली माध्यमे करीत आहेत. त्याचबरोबर या प्रक्षेपणाद्वारे इराणने आपल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची क्षमता जगासमोर उघड केली, याकडे इस्रायली लष्करी विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply