सुलेमानी यांच्या हत्येवरुन इराणची अमेरिकेला धमकी

सुलेमानीतेहरान – ‘दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी यांची हत्या घडविली होती. हा एक प्रकारचा दहशतवादी हल्लाच असून यासाठी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील विद्यमान प्रशासन देखील जबाबदार आहे’, असा ठपका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला.

३ जानेवारी २०२० रोजी इराकची राजधानी बगदादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर मोटारीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाले होते. या घटनेला सोमवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना गंभीर परिणामांची धमकी दिली. सुलेमानी यांची हत्या घडविणार्‍या ट्रम्प यांना शासन केल्यानंतरच इराणचा सूड पूर्ण होईल, अशी घोषणा इराणमधील धार्मिक नेते आयातुल्ला अहमद खातामी यांनी केली.

सुलेमानीत्याचबरोबर अमेरिकेच्या दूतावासाची प्रतिकृती तयार केली व त्याला आग लावून इराणने अमेरिकेला इशारा दिला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुलेमानी यांच्या हत्येसाठी अमेरिकेचे सध्याचे बायडेन प्रशासन देखील जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. त्याचबरोबर या दहशतवादी कृत्यासाठी जबाबदार अमेरिकेला दोषी ठरविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणला सहाय्य करावे, असे आवाहन इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले.

दरम्यान, सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरील हल्ले वाढले आहेत. सुरुवातीला इराणने या हल्ल्यांची चढविल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पण गेल्या काही महिन्यांपासून इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी गट अमेरिकेचे जवान व लष्करी तळांना लक्ष्य करीत आहेत.

leave a reply