संघर्षबंदीनंतरही हौथींकडून ‘चाईल्ड सोल्जर्स’ची भरती

‘चाईल्ड सोल्जर्स'सना – संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करून येमेनमध्ये लागू केलेली संघर्षबंदी हौथी बंडखोरांनी निकालात काढली. या संघर्षबंदीच्या काळात हौथी बंडखोर 10 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांची ‘चाईल्ड सोल्जर’ म्हणून भरती करीत असल्याचे उघड झाले आहे. हौथी बंडखोर संघटनेतील दोन कमांडर्सनीच ही माहिती दिली. त्याचबरोबर हौथींनी तेझ शहरात तैनात येमेनी लष्करावर हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून येमेन गृहयुद्धामध्ये होरपळून निघाला आहे. 2014 सालापासून आखाती देशांचे समर्थन असलेले येमेनमधील सरकार आणि हौथी बंडखोरांमध्ये संघर्ष सुरू आहे. येमेनमधील हादी सरकारला पाठिंबा असलेले सौदी अरेबिया, युएई, इजिप्त, बाहरिन हे देश देखील या संघर्षात सहभागी झाले होते. गेल्या आठ वर्षांच्या या गृहयुद्धात दीड लाख जण ठार झाल्याचा दावा केला जातो. या संघर्षामुळे येमेनमध्ये दुष्काळ, उपासमारीचे संकट ओढावले आहे.

येमेनच्या जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी एप्रिल महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घेऊन हादी सरकार आणि हौथी बंडखोरांमध्ये संघर्षबंदी लागू केली. गेले दोन महिने राष्ट्रसंघाने लागू केलेली ही संघर्षबंदी यशस्वी झाल्याच्या बातम्या येत होत्या. पण दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओनंतर हौथी बंडखोरांनी संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचे आरोप होऊ लागलेआहेत.

या व्हिडिओमध्ये हौथी बंडखोर एका शाळेच्या वर्गात येमेनी मुलांना ‘एके-47′ रायफली चालविण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे हौथी बंडखोर चाईल्ड सोल्जर अर्थात बाल सैनिक तयार करीतअसल्याची टीका होत आहे. या संघटनेतील दोन कमांडर्सनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना आपल्यावरील आरोप कबुल केले. पण 10 ते 12 वर्ष वयोगटातील ही मुलं नसून ते तरुण असल्याचा अजब दावा हौथी बंडखोरांनी केला. त्यामुळे या तरुणांना सौदी अरेबिया व अमेरिकेविरोधी हल्ल्यांसाठी प्रशिक्षण देणे योग्यच ठरते असे या कमांडर्सचे म्हणणे आहे.

मात्र हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर हौथींनी संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याची टीका सुरू झाली आहे. तसेच कुठल्याही संघर्षात अल्पवयीन मुलांचा वापर संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांनुसार मोठा गुन्हा ठरतो. त्यामुळे यावरुन हौथी बंडखोरांवर कारवाई होऊ शकते.

leave a reply