फ्रान्स मालीतील दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवित आहे

- मालीच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रेबमाको – ‘फ्रान्स मालीच्या हवाईहद्दीचे उल्लंघन करून कट्टरवादी आणि दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवित आहे. फ्रान्सच्या या कारवाया पश्चिमी आफ्रिकी क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करतील’, असा आरोप मालीचे परराष्ट्रमंत्री अब्दोलाए दिओप यांनी केला. मालीने संयुक्त राष्ट्रसंघाकडे पाठविलेल्या पत्रात फ्रान्सवर हे गंभीर आरोप केले आहेत. गेली नऊ वर्षे मालीमधील दहशतवादविरोधी लष्करी मोहिमेत फ्रान्सचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच फ्रान्सने मालीतील आपली नऊ वर्षांची लष्करी मोहीम संपवून सैन्य माघारी घेतले. अशा परिस्थितीत मालीने फ्रान्सवर केलेल्या आरोपांचे गांभीर्य वाढले आहे.

मालीसह नायजर, नायजेरिया, सेनेगल, मॉरिशियाना आणि बुर्कीना फासो हे आफ्रिकी देश ‘साहेल’ भागात मोडले जातात. गेली काही वर्षे हा भाग दहशतवादाचा बळी ठरत असून बोको हराम तसेच अल कायदा व आयएसशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनांचा प्रभाव वाढत आहे. कधीकाळी आपली वसाहत असलेल्या या भागातील दहशतवादविरोधी कारवाईसाठी फ्रान्सने २०१३ साली मालीमध्ये आपले हजारो जवान तैनात केले होते. आत्तापर्यंतच्या संघर्षात तीन हजारांहून अधिक दहशतवाद्यांचा खातमा केल्याचा दावा केला जातो.

दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रेपण काही आठवड्यांपूर्वी मालीमध्ये कर्नल असिमी गोईता यांची जुंटा राजवट प्रस्थापित झाल्यानंतर, मालीच्या फ्रान्सबरोबरील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. फ्रान्सचे लष्कर दहशतवाद्यांना सहाय्य करीत असल्याचा आरोप मालीच्या जुंटा राजवटीने सुरू केला होता. पण याप्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघाला थेट पत्र पाठवून मालीने फ्रान्सवरील आरोपांचे गांभीर्य वाढविले आहे. चार दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाला पाठविलेल्या या पत्राची माहिती मालीचे परराष्ट्रमंत्री अब्दोलाए दिओप यांनी माध्यमांना दिली.

गेल्या काही वर्षांमध्ये फ्रान्सने मालीच्या हवाई हद्दीचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केल्याचा आरोप परराष्ट्रमंत्री दिओप यांनी केला. ‘मालीच्या सरकारविरोधातील माहिती गोळा करणे आणि शस्त्र पुरविण्यासाठी फ्रान्सचे लष्कर ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमानांचा वापर करीत आहे. या वर्षातच फ्रान्सने मालीच्या हवाईहद्दीचे ५० वेळा उल्लंघन केले आहे. याद्वारे फ्रान्स दहशतवाद्यांना शस्त्रसाठा पुरवित आहे’, असा गंभीर आरोप मालीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. तसेच यासंबंधी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा परराष्ट्रमंत्री दिओप यांनी केला. पण राष्ट्रसंघाला पाठविलेल्या पत्रासोबत मालीने पुरावे दिलेले नसल्याची माहिती समोर येत आहे.

फ्रान्सने मालीचे हे आरोप फेटाळले आहेत. ‘फ्रान्सने कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दहशतवादी संघटनांना समर्थन दिलेले नाही’, असे मालीतील फ्रेंच दूतावासाने स्पष्ट केले. याउलट मालीतील दहशतवादविरोधी युद्धामध्ये फ्रान्सच्या ५३ जवानांचा बळी गेल्याची आठवण फ्रान्सच्या दूतावासाने करुन दिली.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून मालीने दहशतवादविरोधी युद्धासाठी फ्रान्सऐवजी रशियाचे सहाय्य घेतल्याच्या बातम्या येत आहेत. मालीच्या जुंटा राजवटीने फ्रेंच लष्कराला देश सोडण्याची सूचना करून रशियाच्या कंत्राटी जवानांना तैनात केल्याचे आरोप झाले होते. सध्या युक्रेनमधील युद्धावरुन अमेरिका, युरोपिय देशांचा रशियाबरोबर तणाव निर्माण झालेला असताना, मालीने फ्रेंच लष्कराला देशाबाहेर काढून रशियन कंत्राटी जवानांना तैनात केल्यानंतर त्यावर पाशिमात्यांकडून त्याव जोरदार टीका झाली होती.

leave a reply