भारताला एकाएकी रशियाबरोबरील संबंधातून माघार घेता येणार नाही

- अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा ‘संदेश’

रशियाबरोबरील संबंधातून

वॉशिंग्टन – इंधनाचे दर कडाडलेले असताना, भारताला रशियाकडून इंधन खरेदी करणे भाग आहे. भारताने ही बाब अमेरिकेला पटवून दिली आणि अमेरिकेने ते मान्य देखील केले, असा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकताच केला होता. त्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली आहे. ‘भारताला रशियाबरोबरील संबंधातून एकाएकी माघार घेता येणार नाही. त्यासाठी बराच वेळ लागेल याची अमेरिकेला जाणीव आहे’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी म्हटले आहे.

भारत रशियाकडून खरेदी करीत असलेल्या इंधनाच्या प्रत्येक बॅरलला युक्रेनी जनतेचे रक्त लागलेले आहे, अशी जहाल टीका युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी नुकतीच केली होती. युरोपिय देश देखील भारताच्या रशियाबरोबरील इंधन व्यवहारावर नाराजी व्यक्त करीत आहे. अमेरिकेने या प्रकरणी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन हजार डॉलर्स इतकेच दरडोई उत्पन्न असलेल्या आपल्या जनतेसाठी शक्य तितक्या माफक दरात इंधन उपलब्ध करून देणे हा भारताच्या कर्तव्याचा भाग ठरतो. यासाठीच आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर कडाडलेले असताना, भारत रशियाकडून सवलतीच्या दरात इंधन खरेदी करीत आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले होते. आपल्या थायलंड भेटीत जयशंकर यांनी ही बाब अमेरिकेला पटवून देण्यात भारत यशस्वी ठरल्याचाही दावा केला होता.

त्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली आहे. लाईटच्या स्विचप्रमाणे भारत रशियाबरोबरील आपले संबंध चालू किंवा बंद करू शकणार नाही, याची अमेरिकेला जाणीव आहे. रशियाबरोबर कित्येक दशकांपासून सहकार्य असलेला भारतासारख्या देशासाठी रशियापासून फटकून परराष्ट्र धोरण आखणे सोपे नाही. त्यासाठी काही कालावधी लागेल. यासाठी अमेरिका भारताबरोबर द्विपक्षीय पातळीवर तसेच क्वाडच्या माध्यमातून सहकार्य वाढवित आहे. याद्वारे भारतला अमेरिकेकडून संदेश दिले जात आहेत. भारत देखील आपल्या सार्वभौमत्त्वाच्या मुद्यावर सुस्पष्ट भूमिका घेत असून याचे उल्लंघन कुठून सुरू होते, याबाबतची भारताची धारणा ठाम आहे, असे नेड प्राईस पुढे म्हणाले.

भारताच्या रशियाबरोबरील संबंध तसेच सहकार्यावर अमेरिकेची नजर असल्याचे संकेत देणारी विधाने नेड प्राईस यांनी केली आहेत. सध्या भारताला रशियाबरोबरील सहकार्याखेरीज पर्याय नसला तरी आत्तापासूनच रशियापासून फारकत घेणारे निर्णय भारताने घ्यायला हवेत, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. या आघाडीवर भारत काय करीत आहे, ते अमेरिका बारकाईने पाहत असल्याचे नेड प्राईस राजनैतिक भाषेत सांगत आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल रशियाच्या भेटीवर असताना, नेड प्राईस यांनी केलेल्या या विधानांचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

दरम्यान, या महिन्याच्या अखेरीस रशियाच्या वोस्तोक युद्धसरावात भारत सहभागी होणार आहे. यावरही नेड प्राईस यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली. अमेरिका आणि अन्य देशांपैकी एक पर्याय निवडा, अशी सक्ती अमेरिकेने कुणालाही केलेली नाही. कुणाबरोबर युद्धसराव करायचा याचा निर्णय सार्वभौम देश आपल्या इच्छेनुसार घेतात, असे सांगून भारताच्या रशियाबरोबरील युद्धसरावावर टीका करण्याचे नेड प्राईस यांनी टाळले. त्यामुळे सध्या तरी अमेरिका भारताच्या रशियाबरोबरील सहकार्याच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यास उत्सुक नसल्याचे दिसत आहे. मात्र रशियाबरोबरील सहकार्याच्या मुद्यावर भारताला अमेरिका देत असलेली सवलत कायम राहणार नाही. कधीतरी भारताला रशियाबरोबरील संबंध मागे टाकून अमेरिकेशी संपूर्ण सहकार्य करावे लागेल, असे संदेशही अमेरिकेकडून दिले जात आहेत.

leave a reply