दहशतवाद, कट्टरवाद, अमली पदार्थांच्या व्यापारापासून अफगाणिस्तानला मुक्त करा

- हार्ट ऑफ एशियामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे आवाहन

दुसांबे – दहशतवाद, हिंसक कट्टरवाद, अमली पदार्थांच्या व्यापाराचे व इतर संघटीत गुन्हेगारीचे अड्डे यापासून अफगाणिस्तानला मुक्त करण्याचे ध्येय आपल्या सर्वांसमोर असले पाहिजे. खरोखरच आपल्याला अफगाणिस्तानात शांतता हवी असेल, तर या देशाच्या सभोवतीही शांतता प्रस्थापित करणे भाग आहे, अशा नेमक्या शब्दात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या मूळ समस्येवर बोट ठेवले. ताजिकिस्तानची राजधानी दुसांबे येथे सुरू असलेल्या ‘हार्ट ऑफ एशिया’ या अफगाणिस्तानविषयक परिषदेत बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या समस्येचे मूळ पाकिस्तानात असल्याचे थेट नामोल्लेख न करता उघड केले.

हिंसाचार, भीषण रक्तपात हे अफगाणिस्तानात दैनंदिन पातळीवरील वास्तव बनले आहे. अफगाणिस्तानच्या भूमीत घुसलेले परदेशी मारेकर्‍यांची समस्या अधिकच चिंताजनक ठरत आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करणे अत्यावश्यक बनले आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले. त्याचवेळी अफगाणिस्तानात आपल्याला खरोखरच शांतता हवी असेल तर शेजारी देशांमध्येही शांतता असणे आवश्यक आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अफगाणिस्तानमधील हिंसाचाराचे मूळ पाकिस्तानात असल्याचे संकेत दिले. दहशतवाद, हिंसक कट्टरवाद, अमली पदार्थांचा व्यापार आणि इतर प्रकारच्या संघटीत गुन्हेगारीपासून अफगाणिस्तानला मुक्त करणे, हे आपल्या सर्वांचे ध्येय असलेच पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली.

दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी सर्वसामावेशक अफगाणिस्तानच्या उभारणीची गरज आहे. याकरिता ‘हार्ट ऑफ एशिया’ची स्थापना ज्या उदात्त हेतूने झाली, त्याच्याशी सर्वांनी बांधिल असले पाहिजे. या आघाडीवर सामूहिक यश मिळविणे अतिशय अवघड आहे. पण ते साधले नाही तर सामूहिक अपयश हाच एकमेव पर्याय असू शकतो, असे सांगून अफगाणिस्तानच्या शांतीप्रक्रियेचे महत्त्व भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अधोरेखित केले.

गेल्या वर्षी कतारची राजधानी दोहा येथे अमेरिकेबरोबर केलेल्या करारानुसार तालिबानने अफगाणिस्तानातील हिंसाचार कमी करण्याचे मान्य केले होते. कुणी कितीही आश्‍वासने दिलेली असली तरी अफगाणिस्तानातील परिस्थिती सुधारलेली नाही, याकडे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्ष वेधले. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने अफगाणिस्तानात शांतीप्रक्रिया सुरू व्हावी, अशी भारताची अपेक्षा आहे. या प्रक्रियेच्या अंतर्गत अफगाणिस्तानच्या जनतेला आपले सरकार निवडण्याचा अधिकार मिळावा. अफगाणिस्तानचे सार्वभौमत्त्व, या देशातील अल्पसंख्यांक तसेच महिलांचे व मुलांचे अधिकार सुरक्षित असावे आणि इथले वातावरण सर्वांसाठीच भयमुक्त असावे, अशी मागणी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली.

दोन दशकांच्या संघर्षातही अफगाणिस्तानने आत्तापर्यंत जे काही कमावले आहे, त्याचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे जयशंकर यांनी ठासून सांगितले. भारताने आत्तापर्यंत अफगाणिस्तानच्या विकासासाठी तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या ३४ प्रांतांमध्ये ५५०हून अधिक समाजगटांसाठी विकासप्रकल्पांचा समावेश आहे. अफगाणी जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठीही भारताने प्रकल्प राबविला आहे, याकडेही जयशंकर यांनी लक्ष वेधले. पुढच्या काळातही भारत अफगाणिस्तानच्या स्थैर्य व विकासासाठी सर्वाधिक प्रयत्न करीत राहिल. अफगाणिस्तानचे स्थैर्य व शांतता यावर या क्षेत्राचे स्थैर्य अवलंबून आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारत अफगाणिस्तानसाठी देत असलेल्या योगदानाची माहिती दिली.

भारत इराणचे छाबहार बंदर विकसित करून अफगाणिस्तानला आवश्यक गोष्टींचा पुरवठा करीत आहे. याबरोबरच हवाई मार्गानेही भारत अफगाणिस्तानच्या शहरांना आवश्यक सहाय्य पुरवित आहे, असे जयशंकर पुढे म्हणाले. दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत आपल्या देशातील शांतीप्रक्रियेसाठी देत असलेल्या योगदानासाठी कृतज्ञता व्यक्त केली.

leave a reply