इराण, सिरियाच्या मुद्यावर रशिया-सौदीची चर्चा

मॉस्को – इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत उदार धोरण स्वीकारण्याच्या तयारीत असलेल्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाच्या धोरणांचे पडसाद आखाती क्षेत्रात उमटत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री मिखाईल बोग्दानोव्ह आणि सौदी अरेबियाचे उपपरराष्ट्र राज्यमंत्री अदेल बिन अहमद अल-जुबैर यांच्यात महत्त्वाची चर्चा पार पडली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्याची तयारी करून इस्रायल व सौदी अरेबिया आणि आखातातील इतर मित्रदेशांना दुखावले आहे. याचा लाभ घेऊन रशिया आखाती क्षेत्रातील आपला प्रभाव वाढविल, असा इशारा काही अमेरिकी मुत्सद्यांनी दिला होता. रशियाचे उपरराष्ट्रमंत्री व सौदीच्या उपपरराष्ट्र राज्यमंत्र्यांमध्ये झालेली चर्चा, यात रशियाने दिलेला प्रस्ताव, हे सारे अमेरिकन मुत्सद्यांची चिंता निराधार नसल्याचे दाखवून देत आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आखातासाठी नियुुक्त केलेले विशेषदूत आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री बोग्दानोव्ह आणि सौदीचे जुबैर यांच्यात फोनवरुन चर्चा पार पडली. यासाठी सौदी अरेबियाने पुढाकार घेतला होता, अशी माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. या चर्चेतील काही तपशील रशियाने प्रसिद्ध केले आहेत. आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय समस्या सोडविण्यासाठी रशिया व सौदीतील परराष्ट्र धोरण सर्वसमावेशक करावे लागेल, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

यामध्ये सिरियातील सध्याची परिस्थिती व लेबेनॉनमधील घडामोडींवर चर्चा पार पडल्याची माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. तर इराणबरोबरच्या अणुकराराबाबत सुरू असलेल्या हालचालींवर दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशाची भूमिका मांडली. याशिवाय धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या आखाती क्षेत्राच्या सामूहिक सुरक्षेबाबत रशियाने दिलेल्या प्रस्तावावरही सौदी विचार करीत असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियन सरकारशी संलग्न वृत्तसंस्थेने यासंबंधीची बातमी प्रसिद्ध केली.

सिरियातील अस्साद यांची राजवटीशी व या देशातील इराणच्या वाढत्या प्रभावाबाबत रशिया समाधानी नसल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध झाल्या होत्या. लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या गटाने यासंदर्भात रशियाचा दौरा करून परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी सौदीचा दौरा केला होता.

leave a reply