अमेरिकेनंतर भारताचा फ्रेंच नौदलाबरोबर युद्धसराव

कोची – भारतीय नौदलाचा अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका थिओडोर रूझवेल्ट बरोबरचा ‘पासेक्स’ युद्धसराव संपून काही तास उलटण्याच्या आत फ्रेंच युद्धनौका नौदलाच्या कोची बंदरात दाखल झाल्या आहेत. लवकरच भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांच्या नौदलाचा बंगालच्या उपसागरात संयुक्त सराव होणार आहे. कोची बंदरात दाखल झालेल्या फ्रेंच युद्धनौका भारतीय नौदलाबरोबरील सरावात सहभागी होतील. हा सराव म्हणजे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनला रोखण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले महत्त्वाचेे पाऊल ठरते.

अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस थिओडोर रूझवेल्ट’, ‘युएसएस बंकर हिल’, ‘युएसएस रसेल’ या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा सहभाग असलेला पासेक्स युद्धसराव २८ ते २९ मार्च दरम्यान पार पडला. या संयुक्त युद्धसरावात भारतीय नौदलाची ‘आयएनएस शिवालिक’ ही विनाशिका तसेच सागरी गस्त करणारे ‘पी-८आय’ विमान सहभागी झाले होते. हिंदी महासागरात पार पडलेला हा सराव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. स्वतंत्र, मुक्त आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक क्षेत्र ही भारत व अमेरिकेची प्राथमिकता आहे. दोन्ही देशांचा समान मुल्यांवर विश्‍वास आहे आणि म्हणूनच हा युद्धसराव अतिशय महत्त्वाचा ठरतो, असे अमेरिकन नौदलाचे रिअर ऍडमिरल डॉ वेरिसिमो यांनी म्हटले आहे.

पाणबुडीविरोधी युद्धतंत्र, संयुक्त हवाई मोहीम, कमांड अँड कंट्रोल इंटिग्रेशन (सी२) यांचा या सरावात समावेश होता, आशी माहिती रिअर ऍडमिरल वेरिसिमो यांनी दिली. या युद्धसरावानंतर अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांचा ताफा पॅसिफिक महासागराच्या दिशेने रवाना झाला. यानंतर अवघ्या काही तासात, मंगळवारी सकाळी फ्रेंच नौदलाच्या युद्धनौका भारताच्या कोची बंदरात दाखल?झाल्या. यामध्ये हेलिकॉप्टरवाहू टोनेर व सर्कोख या विनाशिकेचा समावेश आहे. १ एप्रिलपर्यंत या फ्रेंच युद्धनौका कोची बंदरात असतील. बंगालच्या उपसागरात लवकरच क्वाड देशांचा युद्धसराव आयोजित केला जाईल. त्यात सहभागी होण्यासाठी या युद्धनौका लवकरच रवाना होतील. फ्रान्सच्या नौदलाकडून ‘ला पेरूस’ युद्धसरावाचे आयोजन केले जाते. यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान हे क्वाडचे सदस्य असलेले देश सहभागी होतात. आता भारताचाही या युद्धसरावात झालेला सहभाग म्हणजे फ्रान्सचा क्वाडबरोबरील युद्धसराव ठरतो. बंगालच्या उपसागरातील हा संयुक्त युद्धसराव म्हणजे चीनला देण्यात येत असलेला इशारा ठरतो. गेल्या काही दिवसांपासून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आक्रमकतेत झालेली वाढ लक्षात घेता, क्वाड तसेच फ्रान्सच्या या युद्धसरावाचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

चीनने तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरीची तीव्रता वाढविली आहे. त्याचवेळी फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत चीनच्या २२०हून अधिक जहाजांनी घुसखोरी केलेली आहे. त्याचवेळी जपानच्या सेंकाकू द्वीपसमुहाच्या क्षेत्रातही चीन घुसखोरी करीत असल्याची बाब समोर आली होती. याची गंभीर दखल सार्‍या जगाने घेतलेली आहे. मात्र चीन यासंदर्भात व्यक्त केल्या जाणार्‍या चिंतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असून आपल्या आक्रमक कारवाया अधिकच वाढवित आहे. त्यामुळे चीनला रोखणे अनिवार्य बनले असून यासाठी क्वाड देश तसेच फ्रान्सने हालचाली सुरू केल्या आहेत. ब्रिटन आणि जर्मनीने देखील आपल्या नौदलाला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सक्रीय करण्याचे संकेत दिले होते.

पुढच्या काळात क्वाडचे सहकार्य तसेच त्याला युरोपियन देशांकडून मिळणारे समर्थन हे चीनसमोरील मोठे आव्हान ठरू शकते. सध्या तरी चीन आपल्याला या आव्हानाची पर्वा नसल्याचे इशारे आपल्या कारवायांद्वारे देत आहे. पण चीनने या कारवाया थांबविल्या नाहीत, तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अधिक सक्रीय भूमिका पार पाडण्याचा निर्णय क्वाड तसेच युरोपिय देशांना घ्यावा लागेल.

leave a reply