फ्रान्सने बुर्किना फासोत केलेल्या हवाईहल्ल्यांमध्ये 40 दहशतवादी ठार

पॅरिस – फ्रान्सच्या हवाईदलाने आफ्रिकेतील बुर्किना फासोत केलेल्या हवाईहल्ल्यांमध्ये 40 दहशतवादी ठार झाले आहेत. फ्रेंच लष्कराने शनिवारी ट्विटर अकाऊंटवर या मोहिमेची माहिती दिली. फ्रान्सने गेल्या महिन्याभरात ‘ऑपरेशन बरखाने` अंतर्गत बुर्किना फासोत केलेली ही तिसरी मोठी कारवाई ठरली आहे. या सलग कारवायांमुळे फ्रान्स आफ्रिकेच्या साहेल क्षेत्रातील दहशतवादविरोधी मोहिमेची व्याप्ती पुन्हा वाढवित असल्याचे संकेत मिळाले आहेत.

फ्रान्सने बुर्किना फासोत केलेल्या हवाईहल्ल्यांमध्ये 40 दहशतवादी ठारफ्रान्सने 2014 सालापासून आफ्रिकेच्या साहेल क्षेत्रात ‘ऑपरेशन बरखाने` ही दहशतवादविरोधी मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत, बुर्किना फासोसह चाड, माली, नायजर व मॉरिशानिआ या देशांमधील दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई सुरू आहे. गेल्या दोन वर्षात मालीत एकापाठोपाठ झालेल्या लष्करी बंडांमुळे फ्रान्सच्या या मोहिमेला धक्का बसल्याचे मानले जात होते. फ्रान्सने लष्करी तुकड्या मागे घ्यावात, अशी आग्रही भूमिका मालीने घेतली होती.

मात्र गेल्या एक महिन्याच्या अवधीत फ्रान्सने बुर्किना फासोत तीन मोठ्या दहशतवादविरोधी कारवाया पार पाडल्या आहेत. गेल्या महिन्यात 16 ते 23 जानेवारी या कालावधीत केलेल्या कारवाईत जवळपास 60 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला ‘अन्सरुल इस्लाम` या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशवाद्यांवर कारवाई केली होती. त्यापाठोपाठ केलेल्या नव्या हवाईहल्ल्यांमध्ये 30हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे फ्रान्सच्या लष्कराकडून सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी बुर्किना फासोच्या शेजारी असलेल्या बेनिन या देशात दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका फ्रेंच नागरिकासह नऊ जणांचा बळी गेला होता. फ्रेंच लष्कराने बुर्किना फासोत केलेल्या कारवाईत बेनिनमधील हल्ल्यासाठी कारणीभूत असलेल्या दहशतवादी संघटनेला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येते.

साहेल क्षेत्रातील पाच देशांनी यापूर्वीच ‘जी5एस` नावाने स्वतंत्र दलाची निर्मिती केली असून त्यात तीन हजार जवानांचा समावेश आहे. मात्र त्याला पुरेसे यश मिळाले नसल्याने या युद्धातील फ्रान्सची भूमिका व योगदान महत्त्वाचे ठरते.

leave a reply