इस्रायली कंपनी बहारिनला ड्रोनभेदी यंत्रणा, रडार पुरविणार

ड्रोनभेदी यंत्रणाजेरुसलेम – बराक क्षेपणास्त्रे, हेरॉन ड्रोन्स तसेच लष्करी विमानांच्या निर्मितीत आघाडीवर असलेली इस्रायली कंपनी बहारिनला ड्रोनभेदी यंत्रणा आणि रडार पुरविणार आहे. इराणच्या किनारपट्टीपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या बहारिनसाठी ही ड्रोनभेदी यंत्रणा आणि रडार सहाय्यक ठरणार आहेत. अब्राहम कराराअंतर्गत इस्रायल आणि बहारिनमध्ये हे सहकार्य प्रस्थापित होत आहे. गेल्या आठवड्यातच इस्रायलने बहारिनमध्ये आपला नौदल अधिकारी तैनात करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला होता.

गेल्या वर्षी ‘इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज-आयएआय’ इस्रायली कंपनीच्या बेल्जियमस्थित उपकंपनीबरोबर बहारिनने करार केला. बहारिनने इस्रायली कंपनीकडून कोणती ड्रोनभेदी यंत्रणा खरेदी केली, याचे तपशील समोर आलेले नाहीत. पण बहारिनने आयएआयच्या बॅट्स जीआर१२ या रडारची खरेदी केली आहे. सदर रडार यंत्रणा किनारपट्टी जवळील संशयास्पद हालचाली हेरून त्याचे फोटोग्राफ्स कंट्रोल टॉवरपर्यंत पोहचवते. त्यामुळे सदर रडार यंत्रणेची खरेदी बहारिनच्या सागरी सुरक्षेत वाढ करणारी ठरेल.

ड्रोनभेदी यंत्रणा२०२१ साली हा करार झाला असून या वर्षीच सदर रडार यंत्रणा बहारिनच्या हवाली करण्यात येणार आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांच्या बहारिन दौर्‍यानंतर या कराराची घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी युएईने देखील इस्रायलकडून ड्रोनभेदी यंत्रणेची खरेदी केली होती. आयएआय ही कंपनी हेरॉन, हॅरॉप, हार्पी, आरक्यू-५ हंटर, बर्ड आय अशा वेगवेगळ्या प्रकारातील ड्रोनच्या निर्मितीत आघाडीवर आहे. या ड्रोनच्या खरेदीतही युएई आणि बहारिन उत्सुक असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

ड्रोनभेदी यंत्रणायुएई आणि बहारिन या दोन्ही अरब देशांनी २०२० साली इस्रायलसह अब्राहम करार केला होता. या सहकार्याचा पुढचा टप्पा म्हणून इस्रायल आणि सदर अरब देशांमध्ये लष्करी सहकार्य प्रस्थापित होत असल्याचा दावा केला जातो. या सहकार्य अंतर्गत गेल्या आठवड्यात इस्रायल आणि बहारिनच्या नौदलाने संयुक्त सराव पार पडला होता. यामध्ये सौदी अरेबिया आणि इतर काही देशांच्या नौदलांचा देखील सहभाग होता. तर गेल्या महिन्यात इस्रायल व युएईच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेसह रेड सीच्या क्षेत्रात हवाई सराव केला होता.

याशिवाय इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी गेल्या आठवड्यात बहारिनला भेट दिली होती. इराण व येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोर यांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर गांत्झ यांच्या या बहारिन दौर्‍याचे महत्त्व वाढले होते. त्यांच्या या भेटीनंतर, पुढच्या काही तासातच इस्रायलने बहारिनमध्ये आपला नौदल अधिकारी तैनात करण्याचे जाहीर केले. बहारिनमध्ये तैनात अमेरिकी नौदलाशी संपर्क व समन्वय साधण्यासाठी बाहरिनमध्ये इस्रायली अधिकार्‍याची तैनाती झाल्याची माहिती दिली जाते. बहारिनने देखील या वृत्ताला दुजोरा दिला. बाहरिनच्या किनार्‍यापासून दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या इराणसाठी हा इशारा ठरतो.

leave a reply