इराणच्या ड्रोन्समुळे आखातातील अस्थैर्यात भर पडत आहे

- अमेरिकी अभ्यासगटाचा इशारा

तेहरान – दोन दिवसांपूर्वी इराणने आपल्या लष्करी संचलनात क्षेपणास्त्रांबरोबर ड्रोन्सचे प्रदर्शन केले. ‘आधीच इराणची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, रॉकेट्स आखातातील अस्थैर्याचे कारण ठरत होती. पण आता इराणचे ड्रोन्स येथील अस्थैर्यात भर घालणार आहेत’, असा इशारा अमेरिकी अभ्यासगटाने दिला. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या हवाईतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकी अभ्यासगटाने हा इशारा दिला.

रविवारी लष्करी दिनाच्या निमित्ताने इराणने राजधानी तेहरानमध्ये लष्कराचे संचलन आयोजित केले होते. इराणने या संचलनात आपल्या क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन केले. पण यंदा पहिल्यांदाच इराणने आपल्याकडील ड्रोन्स देखील प्रदर्शित केले. यामध्ये अमेरिकेच्या रिपर, प्रिडेटर ड्रोन्सची नक्कल असलेल्या टेहळणी व बॉम्बर ड्रोन्सप्रमाणे मोहाजिर, यासिर, कमान, कियान अशा वेगवेगळ्या ड्रोन्सचा समावेश होता. ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडिज्’ (आयआयएसएस) या अमेरिकी अभ्यासगटाने इराणच्या ड्रोन्सच्या प्रदर्शनावर चिंता व्यक्त केली.

‘इराणच्या अणुकार्यक्रमाबरोबर या देशाची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे देखील आखातातील अस्थैर्यासाठी कारणीभूत बनली आहेत. कारण इराणची क्षेपणास्त्रे लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, येमेनमधील हौथी, गाझातील हमास व सिरियातील दहशतवादी संघटनांच्या हाती पडण्याची दाट शक्यता आहे. अशीच चिंता इराणच्या ड्रोन्सबाबतही व्यक्त केली जाऊ शकते’, असे ‘आयआयएसएस’ने बजावले आहे.

गेल्या आठवड्यात इराकच्या इरबिल येथील अमेरिकेच्या हवाईतळावर ड्रोन्सचा हल्ला झाला होता. सदर ड्रोन्स इराणी बनावटीचे असल्याचा दावा केला जातो. याशिवाय येमेनमधील हौथी बंडखोरांकडून सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्प तसेच लष्करी व हवाईतळांवर होणार्‍या हल्ल्यांसाठी वापरले जाणारे ड्रोन्स इराणी बनावटीचे आहेत, असा आरोप सौदीने केला होता.

इराणच्या अणुकार्यक्रमाप्रमाणे या देशाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम व ड्रोन्सची निर्मिती देखील आखाती क्षेत्रातील शस्त्रस्पर्धा पेटविणार असल्याचे समोर येत आहे. आयआयएसएसने आपल्या अहवालात व्यक्त केलेली चिंता हेच दाखवून देत आहे.

leave a reply