पाश्‍चात्य देशांच्या वाढलेल्या दबावाच्या पार्श्‍वभूमीवर रशिया व चीनकडून ‘फ्रेंडशिप ट्रिटी’च्या विस्ताराची घोषणा

मॉस्को/बीजिंग – रशिया व चीनमधील ‘फ्रेंडशिप ट्रिटी’च्या विस्तारामुळे दोन देशांमधील संबंध अभूतपूर्व उंचीवर पोहोचले आहेत, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. तर रशिया-चीन संबंध हे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या नव्या रचनेचे उदाहरण ठरते, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यात ‘व्हर्च्युअल कॉन्फरन्स’ पार पडली. गेल्या महिन्याभरात दोन नेत्यांमध्ये पार पडलेली ही दुसरी बैठक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या भेटीनंतर काही दिवसातच पुतिन यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

‘फ्रेंडशिप ट्रिटी’रशिया व चीनमध्ये २००१ साली ‘फ्रेंडशिप ट्रिटी’वर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या. त्याला दोन दशके पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्परांशी संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल जिनपिंग यांना शुभेच्छाही दिल्या. रशिया व चीनमधील सहकार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थैर्याची भूमिका निभावत असल्याची प्रशंसाही पुतिन यांनी केली. यावेळी दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले.

‘रशियाला समृद्ध व स्थिर चीनची गरज आहे, तर चीनला मजबूत व यशस्वी रशियाची आवश्यकता आहे. दोन्ही देश भागीदार म्हणून परस्परांना प्राधान्य देत आहेत. पुढील काळात राजकीय, सुरक्षा, संरक्षण, व्यापार, संस्कृती व आंतरराष्ट्रीय व्यवहार या क्षेत्रांमधील सहकार्य व समन्वय वाढविण्यावर भर दिला जाईल’, असे संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनात जागतिक शस्त्रस्पर्धेचाही उल्लेख असून रशिया व चीनची यासंदर्भातील भूमिका समान असल्याचे नमूद केले आहे.

रशिया व चीन या दोन्ही देशांनी पाश्‍वात्य देशांकडून टाकण्यात येणारा दबाव तसेच निर्बंधांचा समाचार घेतला आहे. ‘दोन्ही देश एकतर्फी निर्बंधांचा ठाम शब्दात विरोध कतात. काही देश लोकशाही व मानवाधिकारांचे कारण पुढे करून इतर देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करीत आहेत’, अशी टीका रशिया व चीनच्या संयुक्त निवेदनात करण्यात आली आहे. जिनपिंग यांची रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीची चिनी माध्यमांनी विशेष दखल घेतली असली तरी रशियन माध्यमांमध्ये मात्र मर्यादित प्रसिद्धी देण्यात आल्याचे दिसून आले आहे.

चिनी माध्यमे व विश्‍लेषकांनी, जिनपिंग यांची रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबरील बैठक पाश्‍चिमात्य देशांना चपराक असल्याचा दावा केला आहे. रशिया व चीनमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दावे काही महिन्यांपूर्वी पाश्‍चात्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. चीनला रोखण्यासाठी अमेरिकेने दोन देशांमधील मतभेदांचा वापर करावा, असे सल्लेही देण्यात आल होते. अमेरिका व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेल्या बैठकीकडेही लक्ष वेधण्यात आले होते. सोमवारी पार पडलेली बैठक व मैत्री कराराचा विस्तार यामुळे पाश्‍चात्यांचा हिरेमोड झाला असावा, असा खोचक टोला ‘ग्लोबल टाईम्स’ या चिनी मुखपत्राने लगावला आहे.

दरम्यान, इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला रोखण्यासाठी अमेरिकेकडून सुरू असणार्‍या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने चीनसमोर ‘मिलिटरी अलायन्स’चा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त ‘न्यूजवीक’ या वेबसाईटने दिले आहे.

leave a reply