भारतातील सोन्याचे दर विक्रमी पातळीवर

नवी दिल्ली – भारतीय बाजारात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे ४८ हजार रुपयांवर गेले आहे. देशात लॉकडाऊनमुळे सोन्याच्या प्रत्यक्ष मागणीत घट झाली असली तरी देशात सोन्याच्या दराने विक्रमी उंची गाठली आहे. सोन्याच्या दरातील ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहेत. २०२१ च्या अखेर पर्यंत सोन्याचे दर ८२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचतील असा अंदाज ‘बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज’ने (बीओएफए एसईसी) याआधी वर्तविला होता.

Gold-Rateजागतिक बाजारात सोन्याचे दर औंसमागे १७५० डॉलर्सवर पोहोचले आहेत. कोरोनाव्हारसमुळे जगभरात अस्थिरतेचे वातावरण असून कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जगातिक पातळीवर आर्थिक मंदीचे संकट आहे. बड्या देशांच्या अर्थव्यवस्थाही डळमळल्या आहेत. शेअर बाजार कोसळत असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीवर विश्वास दाखवत आहेत. यामुळे जगातील पातळीवर सोन्याचे दर वधारत आहेत.

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात होत असलेली वाढ आणि डॉलर्सच्या तुलनेत रुपयात होत असलेल्या घसरणीचा परिणाम भारतातील सोन्याच्या दरावर दिसून येत आहे . शुक्रवारी डॉलर्सच्या तुलनेत रुपयात घसरण होत रुपयाचे मूल्य ७६.१९ रुपयांवर आले. या वर्षी रुपयात ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचे पडसाद सोन्याच्या दरावर दिसून येत आहेत. यावर्षी सोन्याच्या किंमतीत १५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

शेअर बाजार घसरत असल्याने गोल्ड एक्सचेंज ट्रेड फंडमधील (ईटीएफ) गूंतवणुकीत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात “ईटीएफ’मध्ये ८१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. एप्रिल महिन्यात हीच गुंतवणूक ७१३ कोटी होती अशी आकडेवारी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाकडून (एएमएफआय) प्रसिद्ध करण्यात आली होती.

पुढील काही महिन्यात सोन्याच्या दारात वाढ होण्याचा अंदाज गोल्डमन सॅचने वर्तवला आहे. पुढील तीन महिन्यात सोन्याचे दर १८०० डॉलर्स औंस, सहा महिन्यात १९०० डॉलर्स औंस आणि १२ महिन्यात २००० डॉलर्स औंस वर पोहोचतील अशी शक्यता गोल्डमॅन सॅचने व्यक्त केली आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने (बीओएफए एसईसी) २०२१ च्या अखेर पर्यंत सोन्याचे दर औंसमागे ३००० डॉलर्सवर पोहोचतील असा अंदाज वर्तवला होता.

leave a reply