माजी परराष्ट्रमंत्री फुमिओ किशिदा जपानचे नवे पंतप्रधान होणार

टोकिओ – गेल्या दशकात सर्वाधिक काळ जपानचे परराष्ट्रमंत्री राहिलेले फुमिओ किशिदा देशाचे नवे पंतप्रधान म्हणून पुढील आठवड्यात कार्यभार स्वीकारणार आहेत. बुधवारी जपानच्या सत्ताधारी पक्षात नेतृत्त्वासाठी झालेल्या निवडणुकीत किशिदा यांनी कोरोना साथीविरोधातील मोहिमेची जबाबदारी असणारे मंत्री तारो कानो यांचा पराभव केला. किशिदा हे गेल्या १५ महिन्यातील जपानचे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत.

माजी परराष्ट्रमंत्री फुमिओ किशिदा जपानचे नवे पंतप्रधान होणारजपानच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषविणार्‍या शिन्झो ऍबे यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आजारपणामुळे देशाच्या धोरणांवर परिणाम होऊ नये म्हणून राजीनामा देत असल्याचे ऍबे यांनी सांगितले होते. त्यावेळी झालेल्या नेतृत्वपदाच्या निवडणुकीत योशिहिदे सुगा यांनी किशिदा यांचा पराभव केला होता. त्यावेळी सुगा यांनी पुढील निवडणूक आपल्या नेतृत्त्वाखाली लढविण्याचे संकेतही दिले होते.

मात्र कोरोनाची साथ व ऑलिंपिक स्पर्धांच्या पार्श्‍वभूमीवर सुगा यांच्या नेतृत्त्वाविरोधात नाराजीचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच राजीनाम्याची घोषणा केली होती. राजीनामा देताना त्यांनी तारो कोनो यांच्या नावाला समर्थन दिले होते. पण बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी’च्या सदस्यांनी किशिदा यांची निवड केली. सत्ताधारी पक्षातील प्रस्थापित गटाने किशिदा यांच्यामागे ताकद उभी केल्याने त्यांचा विजय सुकर झाला, असा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

माजी परराष्ट्रमंत्री फुमिओ किशिदा जपानचे नवे पंतप्रधान होणारकिशिदा हे जपानच्या राजकारणात सक्रिय असलेल्या निवडक राजकीय कुटंबांपैकी एका कुटुंबाचा भाग मानले जातात. त्यांचे वडील व आजोबा यांनी जपानच्या संसदेत सदस्यपद भूषविले आहे. मवाळ व उदारमतवादी विचारसरणीचे किशिदा जपानच्या हिरोशिमा शहराचे प्रतिनिधित्व करतात. जपानच्या अर्थव्यवस्थेवर अधिक भर देणार्‍या किशिदा यांनी माजी पंतप्रधान ऍबे यांच्या ‘ऍबेनॉमिक्स’ धोरणाला विरोध केला होता.

पुढील आठवड्यात ४ ऑक्टोबरला किशिदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. किशिदा यांच्या कारकिर्दीत चीनसंदर्भातील जपानचे धोरण फरसे बदलणार नाही, अशी अपेक्षा विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे. चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ने किशिदा यांच्या निवडीवर प्रतिक्रिया देताना ते चीनबाबत टोकाची भूमिका घेणार नाहीत, अशी आशा वर्तविली आहे.

leave a reply