लवकरच अफगाणिस्तानप्रमाणे अमेरिकेला सिरिया, पर्शियन आखातातूनही माघार घ्यावी लागेल

- इराणच्या माजी वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचा दावा

तेहरान – अफगाणिस्तानातील मानहानीकारक सैन्यमाघारीनंतर लवकरच अमेरिका सिरिया आणि पर्शियन आखातातूनही पळ काढेल, असा दावा इराणने केला. त्याचबरोबर अमेरिका आधीप्रमाणे धोकादायक उरलेली नसून अपयशी, पळपुटी आणि नैराश्याने भरलेली असल्याचा टोला इराणने लगावला. असे शेरे मारून इराणने आखातातील अमेरिकेच्या मित्र व सहकारी देशांना इशारा दिल्याचे दिसत आहे.

महिन्याभरापूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानातून पूर्ण सैन्यमाघार घेतली. बायडेन प्रशासनाच्या या निर्णयावर अमेरिकेसह जगभरातून जोरदार टीका झाली. बेजबाबदारपणे घेतलेली ही माघार अमेरिकेच्या मित्रदेशांना चुकीचा संदेश देणारी असल्याचे इशारे अमेरिकेचे माजी नेते, राजनैतिक अधिकारी व विश्‍लेषक देत आहेत. चीनने देखील अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीचा दाखला देऊन तैवान व जपानला धमकावले होते. इराणच्या आजी-माजी लष्करी अधिकार्‍यांनी देखील अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीचा लाभ घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचे लष्करी सल्लागार याह्या रहिम सफावी यांनी स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना, अमेरिका सिरिया, पर्शियन आखातातील सैन्यमाघारीवर गांभीर्याने विचार करीत असल्याचा दावा केला. ‘अमेरिकेला पर्शियन आखात आणि पश्‍चिम आशियातून पळ काढायचा आहे, कारण त्यांना या भागात अधिक काळ रहायचे नाही’, असे सफावी यांनी म्हटले. तर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांनी देखील अमेरिका पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला. तसेच अमेरिका आधीप्रमाणे धोकादायक राहिली नसल्याचे सांगून इराण अधिकाधिक शक्तीशाली बनत चालल्याचा इशारा दिला.

दोन दिवसांपूर्वी सिरियाचे परराष्ट्रमंत्री फैझल मेकदाद यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलताना अमेरिकेला धमकावले होते. सिरियातून सैन्य मागे घेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, अन्यथा अफगाणिस्तानप्रमाणे सिरियातही अमेरिकेला नामुष्कीला सामोरे जावे लागेल, असे मेकदाद यांनी बजावले होते. सिरियाप्रमाणे इराकने देखील अमेरिकी जवानांच्या माघारीची मागणी करीत आहे. इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी अमेरिकी जवानांवर हल्ले चढविण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

अमेरिकेने अफगाणिस्तानप्रमाणे सिरिया व इराकमधून माघार घेतली तर येथील कुर्द संघटनांवरील हल्ले तीव्र होऊ शकतात, असा इशाराही दिला जातो. सिरियातील कुर्द संघटनेचे प्रमुख मझलूम अब्दी यांनी अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर कुर्दांच्या सुरक्षेवर परिणाम होणार नसल्याचा दावा केला. पण गेल्या काही दिवसांपासून तुर्की व इराणकडून सिरिया व इराकमधील कुर्दांवर सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका इराक-सिरियामधील कुर्दांना वार्‍यावर सोडणार असल्याची दाट शक्यता समोर येत आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर टीकेचे लक्ष्य ठरलेल्या बायडेन प्रशासनाने आखातातून माघार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेने सौदी अरेबियाच्या सुरक्षेसाठी तैनात केलेली हवाई सुरक्षा यंत्रणा काढून घेतली आहे. तसेच मानवाधिकारांच्या मुद्यावरुन इजिप्तचे लष्करी सहाय्य रोखले होते. इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेची फंडिंगही रोखले होते. पण अमेरिकन सिनेटमध्ये यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सदर इस्रायलच्या फंडिंगचा मार्ग मोकळा केला.

leave a reply