चीनच्या आक्रमकतेत लक्षणीय वाढ झालेली असताना लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्याकडून लडाखमधील संरक्षणसिद्धतेचा आढावा

नवी दिल्ली/लडाख – भारत आणि चीनमधल्या सीमावाद सुटत नाही, तोपर्यंत एलएसीवर दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर येत राहतील, असा इशारा लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी दिला होता. याला एक दिवस उलटत नाही तोच, लष्करप्रमुख लडाखमध्ये दाखल झाले आणि त्यांनी इथल्या संरक्षणसिद्धतेचा आढावा घेतला. एलएसीवर वाढलेल्या तणावासाठी भारत व चीन एकमेकांना जबाबदार धरत असताना, लष्करप्रमुखांची ही लडाख भेट लक्षवेधी ठरते आहे.

चीनच्या आक्रमकतेत लक्षणीय वाढ झालेली असताना लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्याकडून लडाखमधील संरक्षणसिद्धतेचा आढावाभारत व चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वाढलेल्या तणावाला भारतच जबाबदार असल्याचे खापर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी फोडले होते. पत्रकार परिषदेत बोलताना चुनयिंग यांनी भारतीय सैन्याने चीनच्या हद्दीत घुसखोरी केली व हे दोन्ही देशात वाढलेल्या तणावाचे प्रमुख कारण ठरते, असा ठपका ठेवला होता. तर भारतातील चीनचे राजदूत सन वुईडॉंग यांनी क्वाडमधील भारताचा सहभाग हे पंचशीलच्या धोरणांचे उल्लंघन ठरते, अशी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे चीनचे खरे दुखणे समोर आले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यात क्वाडच्या नेत्यांची पहिली प्रत्यक्ष बैठक पार पडली होती. त्यावर चीन वेगवेगळ्या मार्गाने नाराजी नोंदवित असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चीनने लडाखच्या एलएसीजवळ तसेच एलएसीच्या दुसर्‍या भागाजवळील क्षेत्रात हजारोंच्या संख्येने जवान तैनात करून इथला तणाव वाढविला आहे. तसेच लडाखजवळील तिबेटच्या भागात ‘एस-४००’ची तैनाती करून चीन भारतावर लष्करी दडपण वाढविण्याच्या तयारीत आहे. याबरोबरच एलएसीजवळील भागात चीनने आपल्या जवानांसाठी पक्के बांधकाम केले आहे. यावर भारताची करडी नजर रोखलेली असून भारतीय सैन्य याला प्रत्युत्तर देण्याच्या कारवाया करीत आहे. तसेच चीनच्या बेजबाबदार कारवायांमुळेच एलएसीवरील तणाव वाढत असल्याची बाब भारत लक्षात आणून देत आहे. यावर बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारतावर दोषारोप केले.

चीनने भारतात नाही, तर भारतीय सैन्याने चीनच्या भूभाग घुसखोरी केल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी केला. याला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले. एलएसीवर हजारो जवानांची तैनाती करून चीन इथली यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे एलएसीवरील शांती व सौहार्द बाधित झाल्याचा आरोप करून परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या सार्‍याला चीनच कारणीभूत असल्याची टीका केली. चीन करीत असलेल्या तैनातीला उत्तर देण्यासाठी भारतालाही पावले उचलावी लागत आहेत व यासाठीच भारतानेही एलएसीवरील तैनाती वाढविली आहे, असे बागची पुढे म्हणाले.

leave a reply