काश्मीरवर शेरेबाजी करणार्‍या तुर्कीला भारताची चपराक

नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार्‍या तुर्कीचा भारताने चांगलाच समाचार घेतला. दुसर्‍या देशांना मानवाधिकारांवर उपदेश देणार्‍या तुर्कीने आधी स्वतःच याचे पालन करावे, असे भारताने बजावले आहे. सायप्रसचा भूभाग तुर्कीने बळकावला होता व इथल्या जनतेचे मुलभूत अधिकार तुर्कीने नाकारले आहेत, याची आठवण भारताने करून दिली.

तुर्कीने काश्मीरच्या प्रश्‍नावर पाकिस्तानची बाजू उचलून धरली असून गेल्या काही महिन्यांपासून तुर्की भारताच्या विरोधात आक्रमक विधाने करीत आहे. मानवाधिकार परिषदेत तुर्कीने जम्मू व काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा आक्षेप नोंदविला. तुर्कीच्या या शेरेबाजीला भारताच्या सेकंड सेक्रेटरी सीमा पुजानी यांनी मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिले.

‘सायप्रसचा भूभाग बळकावून तुर्कीने इथल्या जनतेच्या मानवाधिकारांचे उल्लंघन केलेले आहे. त्याकडे तुर्कीने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. दुसर्‍या देशांना उपदेश देण्यापेक्षा तुर्कीने स्वतःच यावर आचरण करण्याची आवश्यकता आहे,’ असे सीमा पुजानी यांनी तुर्कीच्या टीकेला ‘राईट टू रिप्लाय’ देताना बजावले. याबरोबरच पुजानी यांनी काश्मीरच्या मुद्यावरून भारतावर टीका करणार्‍या पाकिस्तानला आरसा दाखविला. मानवाधिकारांचे धडधडीत उल्लंघन करणारा पाकिस्तान आपल्या देशात पत्रकार व मानवाधिकार कार्यकर्त्यांना लक्ष्य करीत आहे, याकडे लक्ष वेधून पुजानी यांनी त्याचे दाखलेही दिले.

मानवाधिकारांसाठी झगडणार्‍या कार्यकर्त्या गुलालाई इस्माईल सध्या अमेरिकेत असून त्यांच्या वडिलांवर पाकिस्तानने दहशतवादाचे आरोप ठेवले आहेत. तर इद्रिस खटक या पत्रकाराने पाकिस्तानच्या यंत्रणांना अडचणीत टाकणारे अहवाल दिले व यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. ही दोन्ही प्रकरणे पाकिस्तानातील मानवाधिकारांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारी असल्याचा टोला सीमा पुजानी यांनी लगावला.

leave a reply