युक्रेनचे युद्ध लांबविण्यामागे ‘जॉर्ज सोरस’सारखे उद्योजक

- हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन

युक्रेनचे युद्धबुडापेस्ट – काहीजणांना युक्रेनचे युद्ध लांबविण्यातच अधिक स्वारस्य आहे. हे युद्ध जितके लांबेल तितक्या अधिक प्रमाणात ते यातून पैसे कमावतील. विख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरस हे त्यापैकी एक आहेत, असा गंभीर आरो हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी केला. गेल्याच महिन्यात डॅव्होस इथे बोलताना जॉर्ज सोरस यांनी युक्रेनच्या संघर्षामुळे तिसरे महायुद्ध पेट घेईल आणि त्याने मानवजात नष्ट होण्याचा धोका संभवतो, असा इशारा दिला होता. हे टाळण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना पराभूत करणे अत्यावश्यक बनले आहे, असे सोरस म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर, हंगेरीच्या पंतप्रधानांनी जॉर्ज सोरस यांच्यावर केलेले हे आरोप लक्ष वेधूनघेत आहेत.

हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी एका रेडिओवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोरस यांच्यावर हे गंभीर आरोप केले. शांतता प्रस्थापित झाल्याखेरीज महागाई नियंत्रणात येणार नाही. त्याखेरीज अर्थव्यवस्थेसमोर खडे ठाकलेले प्रश्नही सुटणार नाहीत. मात्र सध्याच्या काळात हंगेरी हा शांततेसाठी प्रयत्न करणारा एकमेव युरोपिय देश आहे. बाकीचे युरोपिय देश युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करीत आहेत. पण या देशांनी युद्धासाठी शस्त्रे नाही, तर शांती प्रस्थापित करण्यासाठी सहाय्य पुरवायला हवे, अशी टीका पंतप्रधान ऑर्बन यांनी केली. त्याचवेळी युक्रेनच्या युद्धापासून फायदे उपटणारे काहीजण हे युद्ध अधिक काळ चालावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप हंगेरीच्या पंतप्रधानांनी केला.

युक्रेनचे युद्धविख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरस हे या युद्धापासून फायदे उपटणाऱ्या उद्योजकांपैकी एक आहेत, असा ठपका पंतप्रधान ऑर्बन यांनी ठेवला. सोरस यांनी उघडपणे हे युद्ध लांबविणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे, याकडे पंतप्रधान ऑर्बन यांनी लक्ष वेधले. जॉर्ज सोरस यांच्यासारखे काहीजण चिथावणी देऊन युक्रेनचे युद्ध अधिकाधिक भडकवित आहेत. त्यांना या युद्धापासून अधिकाधिक लाभ मिळवायचे आहेत. या कारवायांसाठी त्यांना जबाबदार धरालाच हवे, अशी मागणी हंगेरीच्या पंतप्रधानांनी केली. रशियन माध्यमांनी पंतप्रधान ऑर्बन यांचे हे आरोप उचलून धरल्याचे दिसत आहे.

याआधीही पंतप्रधान ऑर्बन यांनी सोरस यांच्यावर सडकून टीका केली होती. अब्जाधिश असलेले जॉर्ज सोरस म्हणजे जगातील सर्वात भ्रष्ट इसम आहेत. राजकीय नेते, पत्रकार, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी आणि सिव्हिल सोसायटीचा मुखवटा परिधान करणारे राजकीय आंदोलकांची मोठी यादी सोरस यांच्या पगारावर काम करीत असल्याचे पंतप्रधान ऑर्बन यांनी 2020 साली बजावले होते. तर हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन आपल्याच देशातील जनतेची गळचेपी करीत असून त्यांचे सरकार सोव्हिएत संघराज्यापेक्षाही अधिक निर्दयी असल्याचा दावा जॉर्ज सोरस यांनी केला होता.

leave a reply