हिजबुल्लाहकडे इस्रायलविरोधात सारे पर्याय तयार आहेत

- हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाची धमकी

नसरल्लाबैरूत – भूमध्य समुद्रातील खनिजांच्या उत्खननावरुन लेबेनॉनमधील हिजबुल्लाह अधिक आक्रमक झाली आहे. ‘लेबेनॉनच्या सागरी हद्दीतील खनिजांची लूट करणाऱ्या इस्रायलला रोखण्यासाठी आमच्याकडे सारे पर्याय तयार आहेत. लेबेनॉनविरोधात युद्ध पुकारले तर इस्रायलने याआधी कधीही अनुभवले नसेल इतके जबर नुकसान सोसावे लागेल’, अशी धमकी हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्ला याने दिली. त्याचबरोबर इस्रायलसह अमेरिका लेबेनॉनचे तुकडे पाडण्याची तयारी करीत असल्याचा आरोप हिजबुल्लाहच्या प्रमुखाने केला.

भूमध्य समुद्रातील ‘कारिश’ या इंधनवायूने समृद्ध असलेल्या क्षेत्रावरुन इस्रायल आणि लेबेनॉनमध्ये वाद भडकला आहे. इस्रायलच्या हैफा शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सागरी क्षेत्रात 30 कोटी बॅरल्सहून अधिक इंधनवायूचा साठा आहे. इस्रायलने कारिश क्षेत्रातील इंधनवायूचे उत्खनन करण्यासाठी ब्रिटीश कंपनीसह करार केला होता. दोन दिवसांपूर्वी कारिश क्षेत्रातील इंधन उत्खननासाठी एक जहाज दाखल झाल्यानंतर लेबेनॉनमधील हिजबुल्लाहने इस्रायलला धमकावण्यास सुरुवात केली आहे.

हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्ला याने कारिश क्षेत्रावर लेबेनॉनचा दावा सांगितला. तसेच इस्रायलला येथील इंधनवायूचे उत्खनन करू देणार नसल्याचा दावा हिजबुल्लाहच्या प्रमुखाने केला. त्याचबरोबर कारिश क्षेत्राचा मुद्दा लेबेनॉनच्या सुरक्षेचा मुख्य देशव्यापी बनविणार असल्याची घोषणा नसरल्लाने केली.

नसरल्ला‘कारिशमधील शेकडो लाखो डॉलर्स किंमतीचा इंधनवायूचा प्रचंड साठा हा लेबेनीज जनतेच्या मालकीचा आहे. लेबेनॉनला आर्थिक संकटातून सोडवायचे असेल आणि जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील, तर या साठ्यावर लेबेनॉनचा अधिकार मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लेबेनॉनच्या सागरी क्षेत्रात सुरू असलेले उत्खनन म्हणजे लेबेनॉनवरील हल्लाच ठरतो’, अशी चिथावणी हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाने केली.

‘लेबेनॉनच्या स्त्रोतांची लूट सुरू असताना हिजबुल्लाह शांत बसू शकत नाही. आपला भूभाग, पाणी, इंधन आणि प्रतिष्ठेची सुरक्षा करणे ही हिजबुल्लाहची जबाबबदारी आहे. म्हणूनच लेबेनॉनच्या खनिजांची लूट रोखण्यासाठी हिजबुल्लाहने इस्रायलविरोधात सर्व पर्याय तयार ठेवले आहेत’, असा इशारा नसरल्लाने दिला. ‘इस्रायल कुठलेही आंतरराष्ट्रीय नियम पाळत नाही, हे त्यांनी गेल्या कित्येक वर्षांच्या कारवाईतून दाखवून दिले आहे. त्यामुळे इस्रायलविरोधात युद्ध हाच पर्याय उरतो’, असे हिजबुल्लाहच्या प्रमुखाने बजावले.

तर अमेरिका आणि इस्रायल लेबेनॉनचे तुकडे करण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप नसरल्लाने केला. ‘कारिशमधील खनिजांच्या उत्खननासाठी तयार झालेल्या लेबेनॉनच्या कंपन्यांना अमेरिका व इस्रायलने धमकावून त्यांना कारिशमध्ये उत्खनन करण्यापासून रोखले. असे करून अमेरिका व इस्रायल लेबेनॉनला स्वत:च्याच खनिजसंपत्तीपासून वंचित करीत आहेत. लेबेनॉनच्या अर्थव्यवस्थेला यामुळे मोठा फटका बसणार असून यामुळे लेबेनॉनमधील उपासमारी वाढेल. असे झाले तर लेबेनॉनमध्ये गृहयुद्ध भडकेल आणि देशाचे तुकडे होतील’, असा दावा नसरल्लाने केला.

दरम्यान, कारिश क्षेत्रातील इंधनाच्या उत्खननापलिकडे इस्रायल लेबेनॉनवर थेट युद्ध लादण्याच्या तयारीत असल्याचा ठपका हिजबुल्लाहच्या प्रमुखाने ठेवला. पण असे झाले तर हिजबुल्लाहकडून इस्रायलला तगडे प्रत्युत्तर मिळेल. यामुळे इस्रायलचे याआधी कधीही झाले नव्हते, असे नुकसान होईल, असे नसरल्ला म्हणाला. हिजबुल्लाहकडे क्षेपणास्त्रांचा मोठा साठा असल्याकडे इस्रायलने म्हटले होते. याच्या सहाय्याने हिजबुल्लाह इस्रायलवर दिवसाकाठी हजार क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवू शकतो, याची इस्रायलने आंतरराष्ट्रीय समुदायाला आठवण करून दिली होती. तसेच हिजबुल्लाहविरोधात युद्धाची तयारी असल्याचेही इस्रायलने जाहीर केले आहे.

leave a reply