पुढील वर्षात अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसेल

- ‘जेपी मॉर्गन’चे प्रमुख जेमी डिमॉन यांचा इशारा

वॉशिंग्टन – महागाईचा भडका, वाढते व्याजदर व रशिया-युक्रेन युद्धाचे मोठे परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असून येत्या सहा ते नऊ महिन्यात अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसेल, असा इशारा ‘जेपी मॉर्गन’चे प्रमुख जेमी डिमॉन यांनी दिला. डिमॉन गेल्या काही काळापासून सातत्याने अमेरिकेतील मंदीच्या शक्यतेची जाणीव करुन देत आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थाही मंदीत जाण्याचे भाकित केल्याने लक्ष वेधले गेले आहे.

‘खरेतर सध्या अमेरिकी अर्थव्यवस्था बरी कामगिरी करीत आहे. मात्र अर्थव्यवस्थेबाबत बोलताना भविष्याचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. वाढती महागाई, अपेक्षेहून अधिक प्रमाणात वाढलेले व्याजदर, पतधोरणातील बदल व रशिया-युक्रेन युद्ध यांचे परिणाम धोक्याची घंटा वाजविणारे घटक आहेत. या अतिशय गंभीर गोष्टी असून त्या अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीकडे ढकलणाऱ्या ठरतील. येत्या सहा ते नऊ महिन्यात आपल्याला मंदीला सामोरे जावे लागेल. युरोपियन अर्थव्यवस्था आधीच मंदीला तोंड देत आहे’, असे डिमॉन यांनी बजावले.

अमेरिकेतील सर्वात मोठी बँक असणाऱ्या ‘जेपी मॉर्गन चेस’च्या प्रमुखांनी यावेळी ‘फेडरल रिझर्व्ह’वर टीका केली. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने महागाईविरोधात खूप उशिराने पावले उचलली, असा ठपका डिमॉन यांनी ठेवला. आता ते वेगाने व्याजदर वाढवीत आहेत व आशा आहे की त्यांना महागाई नियंत्रणात आणण्यात यश मिळेल आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हलकाच फटका बसेल, असेही त्यांनी पुढे म्हटले. अंदाज बांधणे कठीण आहे, पण अमेरिकी जनतेने सज्ज रहावे असेही डिमॉन यांनी बजावले आहे.

गेल्या काही आठवड्यात आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था, अर्थतज्ज्ञ तसेच विश्लेषक सातत्याने मंदीच्या शक्यतेकडे लक्ष वेधत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व वर्ल्ड बँकेने सोमवारी घेतलेल्या संयुक्त बैठकीत 2023 साली जगाला मंदीचा फटका बसेल, असा स्पष्ट इशारा दिला. त्यापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या अहवालात, 2007 साली आलेल्या मंदीपेक्षा अधिक वाईट मंदीला सामोरे जावे लागेल, असे बजावण्यात आले होते. डिमॉन यांच्या वक्तव्याने त्याला दुजोरा मिळाला आहे.

कोरोनाच्या साथीदरम्यान जगातील अनेक आघाडीच्या अर्थव्यवस्थांना मोठ्या घसरणीला तोंड द्यावे लागले होते. या वर्षाच्या सुरुवातीला साथीची तीव्रता कमी झाल्याने अर्थव्यवस्था पुन्हा प्रगतीपथावर येईल, अशी भाकिते करण्यात आली होती. मात्र रशिया-युक्रेन युद्धाने आर्थिक समीकरणे बदलून टाकली असून जागतिक अर्थव्यवस्थेत मोठ्या उलथापालथी होत आहेत. त्यातच विस्कळीत झालेली जागतिक पुरवठा साखळी व चीनमधील ‘झीरो कोविड पॉलिसी’ यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला सातत्याने धक्के बसत आहेत. जगातील प्रमुख देशांच्या विकासदरांमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. पण अमेरिकेसारखे देश मंदी मान्य करण्याचे टाळत आहेत. मात्र अशा धोरणाने परिस्थिती बदलणार नसल्याचे संकेत डिमॉन यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.

leave a reply