रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट गडद झाल्याचे संकेत

- अमेरिकेतील घसरणीपाठोपाठ युरोझोनमध्ये महागाईचा भडका

जागतिक अर्थव्यवस्थेवरीलब्रुसेल्स/वॉशिंग्टन – अमेरिकेची अर्थव्यवस्था सलग दुसऱ्या तिमाहित घसरल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. त्यानंतर 24 तासांच्या आत युरोझोनमध्ये महागाईचा विक्रमी भडका उडाल्याचे जाहीर झाले. युरोपातील आघाडीची अर्थव्यवस्था असणाऱ्या जर्मनीने सलग दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने शून्य टक्के दर नोंदविल्याचे सांगितले आहे. एकापाठोपाठ समोर आलेल्या या आकडेवारीने जागतिक अर्थव्यवस्थेवरील मंदीचे संकट अधिक गडद होत असल्याचे संकेत दिले आहेत.

गुरुवारी अमेरिकी प्रशासनाने आर्थिक आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत अमेरिकेच्या ‘जीडीपी‘मध्ये 0.9 टक्क्यांची घसरण झाली. ही या वर्षातील सलग दुसरी घसरण आहे. जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहित अमेरिकी अर्थव्यवस्थेत दीड टक्क्यांहून अधिक घट नोंदविण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सलग दोन तिमाहिंमध्ये ‘जीडीपी’ घसरला तर अर्थव्यवस्थेत मंदी आल्याचे मानले जाते.

जागतिक अर्थव्यवस्थेवरीलमात्र अमेरिकेत या मुद्यावरून मतभेद असल्याचे समोर येत आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह प्रशासनातील आघाडीचे अधिकारी व यंत्रणा देशात मंदी आल्याचे मान्य करण्यास तयार नाहीत. मात्र आघाडीच्या वित्तसंस्था, अर्थतज्ज्ञ तसेच विश्लेषक अर्थव्यवस्था मंदावत असल्याचे दावे करीत आहेत. महागाईचा भडका, व्याजदरातील वाढ व त्यापाठोपाठ जीडीपीतील घसरण या मुदद्यांवरून अमेरिकेतील विरोधी पक्षांनीही बायडेन प्रशासनाला धारेवर धरले आहे.

अमेरिकी अर्थव्यवस्थेत घसरण होत असतानाच युरोपमधील आर्थिक स्थितीही बिघडत चालल्याचे समोर आले. शुक्रवारी घोषित केलेल्या आकडेवारीनुसार, 19 देशांचा समावेश असलेल्या ‘युरोझोन’मधील महागाई 8.9 टक्क्यांवर पोहोचली आहे. हा युरोझोनमधील महागाईचा उच्चांक ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. रशिया-युक्रेन युद्ध हे ऐतिहासिक भडक्याचे प्रमुख कारण ठरले आहे. युरोझोनमधील इंधनाच्या दरांमध्ये जवळपास 40 टक्क्यांची भर पडली असून अन्नधान्याच्या किमतीही 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या वाढत्या महागाईमुळे युरोपला लवकरच मंदीचा सामना करावा लागेल, असे संकेत मिळत आहेत.

जागतिक अर्थव्यवस्थेवरीलयुरोपमधील आघाडीची अर्थव्यवस्था असणाऱ्या जर्मनीने सलग दुसऱ्या तिमाहित शून्य टक्के विकासदर नोंदविला आहे. जर्मनी हे युरोपचे आर्थिक इंजिन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जर्मनीच्या आर्थिक विकासाची गती कुंठित झाल्यास त्याचे तीव्र पडसाद युरोपिय देशांमध्ये उमटतील, अशी चिंता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. अमेरिका व युरोपिय देशांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या नजिक असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेलाही त्याचे परिणाम सहन करावे लागतील, असे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक’चा दुसरा अहवाल सादर केला आहे. त्यात जागतिक अर्थव्यवस्थेचे भवितव्य अधिक गडद व अनिश्चित बनल्याचे भाकित वर्तविले आहे. 2021 साली सहा टक्क्यांहून अधिक गती राखणारी जागतिक अर्थव्यवस्था यावर्षी 3.2 टक्क्यांपर्यंत मंदावेल,. असे नाणेनिधीने बजावले.

leave a reply