इराण इस्फाहनमध्ये नवी अणुभट्टी उभारणार

- अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाच्या चिंतेत वाढ

वॉशिंग्टन/तेहरान – नातांझ अणुप्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर सावध झालेला इराण इस्फाहन येथे स्वदेशी बनावटीची अणुभट्टी उभारीत आहे. इराणच्या अणुऊर्जा संस्थेच्या प्रमुखांनी याबाबत घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच इराणने इस्फाहन अणुप्रकल्पातील आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरा काढून टाकले होते. यानंतर अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांनी यावर टीका करून इराणचा अणुकार्यक्रम अतिशय वेगाने पुढे जात असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर, सदर प्रकल्पात नवी अणुभट्टी उभारणार असल्याच्या इराणच्या घोषणेने अणुकरारावर ठाम असणाऱ्या अमेरिकेतील बायडेन प्रशासनाची चिंता वाढविली आहे.

अणुभट्टीइराण अणुबॉम्बची निर्मिती करू शकतो, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या वरिष्ठ सल्लागाराने काही दिवसांपूर्वीच दिला होता. अणुबॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान व साहित्य इराणकडे उपलब्ध असल्याचा दावा खामेनी यांच्या सल्लागारांनी केला होता. त्यानंतर इराणच्या अणुकार्यक्रमाच्या वेगावर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जाआयोगाने चिंता व्यक्त केली होती.

गेल्या वर्षभरात व्हिएन्ना व दोहा येथे इराणबरोबरच्या अणुकराराबाबत झालेल्या वाटाघाटी अपयशी ठरल्या आहेत. इराणने अणुकराराच्या मोबदल्यात अमेरिकेकडे केलेल्या मागण्यांची पूर्तता शक्य नसल्याचे बायडेन प्रशासनाने जाहीर केले होते. पण अजूनही अणुकरार शक्य असल्याचे व इराणबरोबर यापुढेही वाटाघाटी करणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जाहीर केले होते. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या भूमिकेवर इस्रायलने नाराजी व्यक्त केली होती. तसेच कुठलाही अणुकरार इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखू शकत नसल्याचा इशारा इस्रायलने दिला होता.

अणुभट्टीअशा परिस्थितीत, इराणने इस्फाहन अणुप्रकल्पात नवी अणुभट्टी उभारण्याची घोषणा केली. इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सदर अणुभट्टी इराणमधील सर्वात मोठी असणार आहे. यामुळे इराणची अणुऊर्जेची गरज पूर्ण करता येईल, असा दावा इस्लामी यांनी केला. पण इस्फाहन अणुप्रकल्पाबाबत इराणच्या या घोषणेकडे इस्रायली व पाश्चिमात्य विश्लेषक व माध्यमे अधिक गांभीर्याने पाहत आहेत.

चार दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या इस्फाहन अणुप्रकल्पाबाबत लक्ष वेधून घेणारी माहिती उघड केली होती. 2015 सालच्या अणुकरारानुसार अणुऊर्जा आयोग सुचवेल, त्या प्रकल्पात इराणला सीसीटीव्ही बसविणे आवश्यक होते. यावर्षी जानेवारी महिन्यात इराणने इस्फाहन येथील सीसीटीव्ही काढून अणुकराराचे उल्लंघन केले होते. त्याचबरोबर अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांच्या अणुप्रकल्पातील भेटीवर इराणने निर्बंध टाकले.

दरम्यान, इस्फाहन अणुप्रकल्पातील हालचाली याआधीच संशयास्पद असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत या ठिकाणी नवी अणुभट्टी उभारण्याची इराणची घोषणा या क्षेत्रातील तणाव वाढविणारी ठरू शकते.

leave a reply