भविष्यातील साथींविरोधात लढा देण्यासाठी ‘ग्लोबल रिसेट’ आवश्यक

- जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

‘ग्लोबल रिसेट’बर्लिन/वॉशिंग्टन – भविष्यातील साथींचे आजार व त्यापासून निर्माण होणारे धोके यासाठी जागतिक स्तरावरील तयारी अपुरी असून यासंदर्भातील रचना पुन्हा मुळापासून नव्याने उभी करावी लागेल, असे आवाहन जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पॅहन यांनी केले. बुधवारी झालेल्या ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या(डब्ल्यूएचओ) बैठकीत स्पॅहन यांनी हे आवाहन केले. ‘डब्ल्यूएचओ’च्या पुढाकाराने जर्मनीत भविष्यातील साथी व आजारांचे संशोधन करणारे केंद्र उभारण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर जर्मन आरोग्यमंत्र्यांनी केलेले आवाहन लक्ष वेधून घेणारे ठरते.

२०१९ सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला असून अजूनही त्याचा फैलाव वेगाने चालू आहे. जगभरात १५ कोटींहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असून बळींची संख्या ३२ लाखांवर गेली आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाव्हायरसचे नवनवीन ‘ग्लोबल रिसेट’‘स्ट्रेन’ विकसित होत असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. साथीच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या फैलावाबाबत वर्तविण्यात आलेले अंदाज तसेच मुकाबला करण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय व योजना अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, ‘डब्ल्यूएचओ’कडून जर्मनीत उभारण्यात येणारे नवे केंद्र महत्त्वाचे मानले जाते. हे केंद्र येत्या वर्षअखेरीस कार्यरत होण्याचे संकेत बुधवारच्या बैठकीत देण्यात आले आहेत. या बैठकीला जर्मन आरोग्यमंत्र्यांबरोबरच ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्युएसदेखील उपस्थित होते. यावेळी जर्मन आरोग्यमंत्र्यांनी नव्या साथीबाबत इशारा देताना आता पुढील धोक्यांचा मुकाबला करण्याची वेळ आली आहे, असेही बजावले. आतापर्यंत विविध साथींचा फैलाव न झालेल्या भागांमध्ये नवे आजार पसरू शकतात, असा दावाही आरोग्यमंत्री स्पॅहन यांनी केला. ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांनीही त्याला दुजोरा दिला असून, नवे आजार व साथी पसरविणारे विषाणू समोर येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

‘ग्लोबल रिसेट’दरम्यान, ‘डब्ल्यूएचओ’चे वरिष्ठ सल्लागार जेमी मेट्झल यांनी कोरोनाच्या मुद्यावरून चीनवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. चीनने कोरोनासंदर्भातील सर्व स्रोत व माहिती सुरुवातीपासून उपलब्ध करून दिली असती, तर अवघ्या काही महिन्यातच साथीचे मूळ उघड झाले असते, अशी टीका मेट्झल यांनी केली. मेट्झल यांनी काही दिवसांपूर्वीच वरिष्ठ तज्ज्ञांच्या सहाय्याने ‘डब्ल्यूएचओ’ला खुले पत्र लिहिले असून त्यात कोरोना संदर्भातील सर्व शक्यतांची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी केली आहे. यासंदर्भात एका मुलाखतीत बोलताना त्यांनी चीनवर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, कोरोना साथीच्या कालावधीत जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसत असल्याची माहिती समोर येत आहे. ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन ऍण्ड डेव्हलपमेंट’ (ओईसीडी) या गटाने, जागतिक गुंतवणुकीत तब्बल ३८ टक्क्यांची घट झाल्याची माहिती दिली. २०२० साली जगभरात फक्त ८४६ अब्ज डॉलर्स इतकीच परकीय गुंतवणूक करण्यात आली. ही गुंतवणूक आंतरराष्ट्रीय जीडीपीच्या फक्त एक टक्का असून १९९९ सालानंतरच्या गुंतवणुकीची ही नीचांकी पातळी आहे, असे ‘ओईसीडी’ने म्हटले आहे. युरोपिय महासंघात होणार्‍या परकीय गुंतवणुकीत तब्बल ७० टक्क्यांची घसरण झाल्याची नोंदही ‘ओईसीडी’च्या अहवालात करण्यात आली आहे.

leave a reply