डिसेंबरपर्यंत सोन्याचे दर ५५ हजारांवर पोहोचण्याचा अंदाज

नवी दिल्ली – भारतात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात या वर्षी तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली असून डिसेंबरपर्यंत सोने प्रति १० ग्रॅममागे ५५,००० हजार रुपयांवर उसळी घेईल असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.

Gold-Rateआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर १८९७ डॉलर्स प्रति औंसच्या विक्रमी पातळीवर पोहचले असून चांदी २२.८४ डॉलर्स प्रति औंसवर पोहचली आहे. परिणामी देशात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे ५१,१५० हजार रुपये आणि चांदी ६२४०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

सोन्याच्या किंमतीत होत असलेली वाढ पुढील काळात देखिल कायम राहणार असून डिसेंबर पर्यंत मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने प्रति १० ग्रॅममागे ५५ हजार रुपयांवर पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोन्यासह चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. भारतीय बाजारात चांदीचा भाव सप्टेंबर २०१३ नंतर पहिल्यांदाच इतक्या उच्चांकी पातळीवर पोहचला आहे.

सध्या देशातील सोन्याच्या प्रत्यक्ष विक्रीत घट झाली असून केवळ १० ते १५ टक्के सोन्याची विक्री होत असल्याचे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी म्हटले आहे. प्रत्यक्ष सोने खरेदीमध्ये घाट झाली असली तरी सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे.

कोरोनाव्हायरसमुळे उदभवलेले आर्थिक संकट, अमेरिका चीनमधील तणाव आणि डॉलर्समध्ये होत असलेल्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर दिसून येत आहे. आर्थिक संकटात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून गोल्ड एक्सचेंज ट्रेड फंड (ईटीएफ) आणि गोल्ड बॉण्डमधील गुंतवणुकीला पसंती देत आहेत. त्यामुळेच प्रत्यक्ष मागणीत घट झाली असताना सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे.

leave a reply