चीन पाकिस्तान मध्ये जैविक शस्‍त्रास्‍त्रांच्या निर्मितीबाबत छुपा करार

- आस्ट्रेलियन शोधपत्रकाराचा दावा

बीजिंग – चीनने पाकिस्तानसोबत अँथ्रेक्स, इबोला आणि याहून भयंकर वि़षाणूंवर संशोधन करुन त्यांची निर्मिती करण्यासंदर्भात छुपा करार केला आहे. पाकिस्तानला जैविक शस्त्रास्त्रांनी सज्ज करणारा चीनचा हा छुपा करार भारत तसेच पाश्चिमात्य देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा दावा ऑस्ट्रेलियन शोधपत्रकार अँथनी क्लॅन यांनी केला आहे. चीनच्या ‘वुहान इन्स्टिट्युट ऑफ वायरोलॉजी’ आणि पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रणातील प्रयोगशाळेत हा करार झाला आहे. जगभरात दीड कोटीहून अधिक जणांचा बळी घेणार्‍या कोरोनाव्हायरसची निर्मिती चीनच्या याच वुहान प्रयोगशाळेत झाल्याचा आरोप पाश्चिमात्य देश करीत आहेत. त्यामुळे क्लॅन यांनी केलेल्या दाव्याकडे अधिक गांभिर्याने पाहिले जात आहे.

China-Pakistan‘क्लॅक्सान’ या आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लेखात शोधपत्रकार क्लॅन यांनी चीन आणि पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या या कराराची तसेच त्याच्या परिणामांची माहिती दिली. चीनच्या वुहान प्रयोगशाळेत आणि पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेल्या ‘डिफेन्स सायन्स अँड टेक्नोलॉजी ऑर्गनायझेशन’ (डिईएसटीओ – डेस्टो) यांच्यात हा तीन वर्षांचा करार पार पडला. या करारांतर्गत चीन पाकिस्तानला भविष्यातील संसर्गजन्य वि़षाणूंवरील संशोधन आणि या विषाणूंवरील नियंत्रण मिळविण्यासंदर्भात सहाय्य करणार असल्याची माहिती सदर संकेतस्थळाने दिली. पण चीनच्या वुहान प्रयोगशाळेत आणि पाकिस्तानच्या लष्करात झालेल्या या छुप्या करारावर गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी गंभीर चिंता व्यक्त केल्याचे संकेतस्थळाने म्हटले आहे.

चीनची वुहान प्रयोगशाळा या जैविक संशोधनासाठी पाकिस्तानला पूर्णपणे आर्थिक, वैज्ञानिक आणि इतर स्तरावरील सहाय्य पुरविणार आहे. पाकिस्तानचे लष्कर यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करणार नसल्याचे संकेतस्थळाने स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानचे सरकार किंवा सरकार संलग्न संस्था या छुप्या करारापासून तसेच या वि़षाणूवरील संशोधनातून अलिप्त ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे थेट पाकिस्तानी लष्कराच्या हातातील प्रयोगशाळेत होणार्‍या या संशोधनाकडे अधिक संशयाने पाहिले जात असल्याची माहिती गुप्तचर अधिकार्‍यांनी या संकेतस्थळाशी बोलताना दिली. हा करार कधी झाला हे क्लॅन यांनी स्पष्ट केलेले नाही. पण पाकिस्तानी लष्कराच्या प्रयोगशाळेत जैविक शस्त्रास्त्रांवरील संशोधन व निर्मिती सुरू झाल्याचा दावा या संकेतस्थळाने केला.

China-Pakistanचीन व पाकिस्तानमधील सदर करार जैविक वि़षाणूंवरील संशोधनासाठी असला तरी यातून मिळणार्‍या तंत्रज्ञानवि़षयीच्या माहितीमुळे पाकिस्तानचा जैवशास्त्राबाबतचा कार्यक्रम धोकादायक ठरत असल्याचे सदर संकेतस्थळाने म्हटले आहे. चिनी प्रयोगशाळेच्या सहाय्याने पाकिस्तानने अँथ्रेक्स आणि इबोला सारख्या वि़षाणूंची निर्मिती केली आहे. हे सहकार्य असेच सुरू राहिले तर पाकिस्तान चीनच्या सहाय्याने लवकरच जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती करील. असे झाले तर भारत आणि पाश्चिमात्य देशांच्या सुरक्षेला असलेला धोका वाढेल, असा इशारा काही लष्करी विश्लेषकांनी दिल्याचे क्लॅन यांनी सांगितले. पाकिस्तानात जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती करुन चीन पाकिस्तानला भारताच्या विरोधात उभा करीत आहेत. त्याचबरोबर आपल्या देशात या जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती टाळून चीन मोठी खेळी खेळत असल्याचा आरोप विश्लेषक करीत आहेत.

दरम्यान, जगभरात हाहाकार माजविणार्‍या कोरोनाव्हायरसची निर्मिती चीनच्या वुहान प्रयोगशाळेत झाल्याचा आरोप अमेरिका, आस्ट्रेलिया, जपान आणि तैवान करीत आहेत. ही साथ म्हणजे जैविक हल्ल्याचा प्रकार असल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला होता.

leave a reply