अमेरिका व रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये ‘नॉर्ड स्ट्रीम२’वर चर्चा होऊ शकते – अमेरिकी अधिकार्‍यांचा दावा

मॉस्को – अमेरिकेने निर्बंध टाकलेल्या रशिया व जर्मनीमधील महत्त्वाकांक्षी ‘नॉर्ड स्ट्रीम२’ इंधनवाहिनीच्या मुद्यावर दोन देशांमध्ये चर्चा होऊ शकते, असा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. या आठवड्यात होणार्‍या आर्क्टिक कौन्सिलच्या बैठकीला दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यात चर्चा होणार असून ‘नॉर्ड स्ट्रीम२’चा मुद्दाही त्यात असू शकतो, असे सांगण्यात येते. दरम्यान, जर्मनीने त्यांच्या सागरी हद्दीत ‘नॉर्ड स्ट्रीम२’ इंधनवाहिनीच्या बांधकामास परवानगीही दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

‘नॉर्ड स्ट्रीम२’वर चर्चायुक्रेनबरोबरील संघर्षानंतर रशियाने युरोपला इंधनपुरवठा करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली होती. त्यातून ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीच्या उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून रशिया व जर्मनीतील ‘नॉर्ड स्ट्रीम २’ अंतिम टप्प्यात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या इंधनवाहिनीविरोधात आक्रमक भूमिका घेऊन निर्बंध लादले होते. मात्र अमेरिकेतील सत्ताबदलानंतर रशिया व जर्मनी या दोन्ही देशांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत.

‘नॉर्ड स्ट्रीम२’वर चर्चासध्या ‘नॉर्ड स्ट्रीम २’ प्रकल्प ९५ टक्के पूर्ण झाला आहे. जर्मनीकडून आपल्या सागरी हद्दीत इंधनवाहिनीच्या उभारणीसाठी परवानगीही देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकार्‍याने केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरत आहे. या आठवड्यात आर्क्टिक कौन्सिलच्या बैठकीसाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन व रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह उपस्थित राहणार आहेत. कौन्सिलच्या बैठकीव्यतिरिक्त दोन्ही नेते भेट घेणार असून त्यात ‘नॉर्ड स्ट्रीम २’चा मुद्दा असू शकतो, असे अमेरिकी अधिकार्‍याने म्हंटले आहे. हे सांगतानाच रशियाचा हा प्रकल्प युरोपच्या इंधनसुरक्षेसाठी धोकादायक असल्याची अमेरिकेची भूमिका कायम असल्याचा पुनरुच्चारही सदर अधिकार्‍याने केला.

जानेवारी महिन्यात परराष्ट्रमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ब्लिंकन यांनी रशिया-जर्मनीमधील इंधनवाहिनीविरोधात अमेरिका सर्व पर्यायांचा वापर करील, असा इशारा दिला होता.

leave a reply