किरकोळ बाजारात सोन्याचे दर ५९ हजारांच्या पुढे

मुंबई – सोमवारी देशातील किरकोळ बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५९,३०० रुपयांवर पोहोचले, तर चांदीच्या दराने ७४,२०० रुपयांचा उच्चांक गाठला. कोरोनाचे संकट, अमेरिका व चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने खरेदीत झालेल्या वाढीमुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

सोन्याचे दर

अमेरिका, युरोप, आशिया व आफ्रिका खंडांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या देखील २२ लाखावर पोहोचली आहे. टप्प्याटप्याने लॉकडाउन उठवण्यात येत असले तरी देशातील लहान मोठ्या उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. देशातीलच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत प्रचंड घसरण झाली असून आर्थिक मंदीला सुरुवात झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. कित्येक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली असली तरी त्याचे सकारात्मक परिणाम अद्याप दिसत नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे कल वाढला आहे.

त्यातच कोरोनाच्या साथीमुळे सामान्य नागरिक, नवीन उद्योजक व लहान व्यावसायिकांना बसलेला आर्थिक फटका बघता सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या बिगर कृषी कर्जावरील सध्याची मर्यादा ७५ टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला होता. ही सवलत ३१ मार्च २०२१ पर्यंत उपलब्ध करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सोने खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी पहिल्या सात महिन्यांमध्येच सोन्याच्या दरामध्ये ३० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली

दरम्यान, वायदा बाजारात ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किंमतीत १.८९ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. यामुळे मल्टीपल कमॉडिटी एक्सचेंज सोन्याच्या किंमती प्रति १० ग्रॅम ५५,२९० पर्यंत खाली आल्या आहेत. मात्र वायदे बाजारात चांदीत तेजी कायम राहण्याचे संकेत मिळत आहे. सप्टेंबरच्या वायदे बाजारात चांदीचे दर ७४१६० प्रति किलो झाले आहेत.

leave a reply