भारत-ताजिकिस्तानमधील आर्थिक सहकार्याला फार मोठी संधी

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

दुसांबे – ताजिकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हार्ट ऑफ एशिया या अफगाणिस्तानविषयक परिषदेत सहभागी झालेल्या भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ताजिकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सिरोजिद्दीन मुहरिद्दीन यांची भेट घेतली. उभय देशांमधील सर्वच पातळ्यांवरील सहकार्य वाढवून दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना देण्यावर परराष्ट्रमंत्री जयशंकर व परराष्ट्रमंत्री महुरिद्दीन यांचे एकमत झाले. भारत व ताजिकिस्तानमधील आर्थिक सहकार्याला फार मोठी संधी आहे, असे यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले.

ताजिकिस्तानमध्ये भारत काही विकासप्रकल्प राबवित असून यामध्ये राजधानी दुसांबे व चोरतूत या शहरांमधल्या आठ पदरी महामार्गाचा समावेश आहे. पुढच्या वर्षापर्यंत याचे काम पूर्ण होईल. पुढच्या काळात भारत ताजिकिस्तानमध्ये नवे प्रकल्प राबवणार असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी जाहीर केले. यामध्ये ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी भारत ताजिकिस्तानला कर्जसहाय्य पुरविणार असल्याची माहिती यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली.

सध्या ताजिकिस्तानच्या शाळांसाठी आयटी उपकरणे, अन्न प्रक्रिया केंद्र, अभियांत्रिकी कार्यशाळा, औषधनिर्मिती केंद्र, आयटी सेंटर्स आणि जलविद्युत निर्मिती प्रकल्पांच्या आधुनिकीकरणासाठी भारत सहाय्य पुरवित आहे, याची माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली. या क्षेत्रात स्थैर्य व शांतता कायम राहणे हे भारत व ताजिकिस्तानच्या हिताचे आहे. म्हणूनच संरक्षण व सुरक्षेच्या आघाडीवर भारत व ताजिकिस्तानचे सहकार्य अधिक भक्कम करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. ताजिकिस्तानचे संरक्षणमंत्री कर्नल जनरल शेराली मिर्झो यांच्याशी आपली यासंदर्भात फलदायी चर्चा झाली, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्रसंघ व इतर संघटनांच्या माध्यमातून भारत व ताजिकिस्तान परस्परांना सहकार्य करीत असतात, ही बाब देखील भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी लक्षात आणून दिली. दरम्यान, ताजिकिस्तान तसेच इतर मध्य आशियार्ई देशांबरोबरील व्यापार वाढविण्यासाठी भारत उत्सुकता दाखवित आहे. मात्र अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियाई देशांबरोबरील भारताच्या व्यापारी वाहतुकीसाठी पाकिस्तानने मार्ग देण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारताच्या मध्य आशियाई देशांबरोबरील व्यापाराला फार मोठ्या मर्यादा आल्या होत्या. मात्र इराणचे छाबहार बंदर विकसित करून भारताने अफगाणिस्तानबरोबरील व्यापाराला गती दिली आहे. पुढच्या काळात अफगाणिस्तानच्या मार्गाने मध्य आशियाई देशांबरोबरोबरील व्यापाराला चालना देण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

ताजिकिस्तान, किरगिझिस्तान, कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान हे मध्य आशियातले नैसर्गिक संपत्तीने संपन्न असलेले देश आहेत. या देशांबरोबर व्यापार वाढविण्यात भारताला यश मिळाले, तर भारतीय अर्थव्यवस्थेची स्थितीगती बदलू शकते. हे मध्य आशियाई देश देखील भारताबरोबरील व्यापार वाढविण्यासाठी तितकेच उत्सुक आहेत. आता यासाठी छाबहार बंदराचा मार्ग खुला झाल्याने या व्यापाराच्या नवनवीन शक्यता समोर येत आहेत. त्यामुळे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ताजिकिस्तानबरोबरील व्यापार वाढविण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न लक्षवेधी ठरतात.

leave a reply