इस्रायली पंतप्रधानांच्या सौदी भेटीद्वारे बायडेन यांना संदेश

-अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले

वॉशिंग्टन – गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सौदी अरेबियाचा अचानक दौरा करून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची घेतलेली ऐतिहासिक भेट सुस्पष्ट संदेश देणारी होती, असे संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी म्हटले आहे. पुढच्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्याच्या तयारीत असलेल्या, ज्यो बायडेन यांनी इराणच्या आयातुल्लांशी सहकार्य प्रस्थापित करण्याची चूक करू नये, हा तो संदेश होता, असे सांगून हॅले यांनी याविरोधात बायडेन यांना इशारा दिला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक असलेल्या हॅले यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये इराण तसेच भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना लक्ष्य केले. राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आल्यास इराणबरोबरचा अणुकरार पुन्हा जिवंत करू, अशी घोषणा बायडेन यांनी काही आठवड्यांपूर्वी केली होती. पण इराणबरोबरचा सदर अणुकरार भयंकर असून बायडेन यांनी हा करार जिवंत करण्यासाठी इराणी आयातुल्लांच्या मागे धावू नये, असा टोला हॅले यांनी हाणला.

त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणांमुळे आखाती क्षेत्र अधिक सुरक्षित बनले होते, असा दावा हॅले यांनी केला. तर आपल्या दुसर्‍या पोस्टमध्ये हॅले यांनी इस्रायली व सौदीच्या नेत्यांमध्ये झालेल्या ऐतिहासिक भेटीचे स्वागत केले. इस्रायल व सौदीच्या नेत्यांची ही भेट संदेश देणारी होती, असे हॅले म्हणाल्या. तसेच आखातात शांती प्रस्थापित करायची असेल तर इराणबरोबर अणुकरार न होऊ देणेच फायद्याचे ठरेल, असे निक्की हॅले यांनी म्हटले आहे.

leave a reply