गुजरात दहशतवादविरोधी पथकाने ६५० कोटींचे हेरॉईन पकडले

- महाराष्ट्रात १.१२७ टन गांजा जप्त

अहमदाबाद/मुंबई – गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने मोरबी जिल्ह्यात कारवाई करीत ६०० कोटी रुपयांचे हेरॉईन पकडले आहे. हे हेरॉईन आफ्रिकेतून तस्करी करून समुद्रीमार्गाने आणण्यात आले होते, अशी माहिती एटीएसने दिली आहे. एका पाकिस्तानी अमली पदार्थ तस्कराचे नाव या प्रकरणात समोर आले आहेत. तसेच तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये अमली पदार्थांची तस्करी पकडली जात असताना नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने (एनसीबी) महाराष्ट्रातील नांदेडमध्ये १.१२७ टन गांजा जप्त केला आहे. एनसीबीच्या मुंबई विभागाने कारवाई करून पकडलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा गांजाचा साठा आहे.

गुजरात दहशतवादविरोधी पथकाने ६५० कोटींचे हेरॉईन पकडले - महाराष्ट्रात १.१२७ टन गांजा जप्तगुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील किनारपट्टीवर असलेल्या झिंजुडा गावात काही जणांनी अंमली पदार्थांची तस्करी केल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. त्यानंतर कारवाई करीत झिंजुडातील काही घरांवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात हे १२० किलो हेरॉईन सापडले. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६५० कोटी रुपये इतकी आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हे अमली पदार्थ समुद्रीमार्गे अफ्रिकेतून तस्करी करून द्वारका जिल्ह्यातील सलाया या किनारपट्टीच्या गावात उतरविण्यात आले. तेथून ते काही दिवसाने झिंजुडातील गावात हलविण्यात आले, अशी माहिती गुजरात एटीएसच्या अधिकार्‍याने दिली.

या प्रकरणात मुख्तार हुसेन उर्फ जब्बार जोडिया, शमस्सुद्दीन हुसेन सय्यद आणि गुलाम हुसेन उमर भागड या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. या तस्करीमागे झैद बशिर बलोच या पाकिस्तानी तस्कराचे नाव समोर आले आहे. त्यानेच ही तस्करी केली होती व पुढे हे तीन आरोपी हे अमली पदार्थ देशातील इतर भागात पोहोचविणार होते. २०१९ साली गुजरात एटीएसने २२७ किलोचा हेरॉईनचा साठा पकडला होता. या प्रकरणात बलोच हा फरार आहे. गेल्या एका वर्षात गुजरात एटीएसने १३२० कोटींचे अंमली पदार्थ पकडले आहेत.

गुजरात दहशतवादविरोधी पथकाने ६५० कोटींचे हेरॉईन पकडले - महाराष्ट्रात १.१२७ टन गांजा जप्तयापूर्वी सप्टेंबर महिन्यात डायरोक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने (डीआरआय) गुजरातच मुंद्रा पोर्टमध्ये ३००० किलो हेरॉईनचा साठा पकडला होता. सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा हा साठा टॅल्कम पावडर आयातीच्या नावाखाली अफगाणिस्तानातून इराणच्या बंदरामार्गे मागविण्यात आला होता. यामागे टेरर फंडिंगचाही संशय असल्याने सध्या हा तपास एनआयए करीत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील नायगांंव तालुक्यात मांजराम भागात एनसीबीने तब्बल एक हजार १२७ किलो इतका गांजाचा साठा पकडला आहे. एनसीबीच्या मुंबई युनिटने पकडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा गांजाचा साठा आहे. एका ट्रकमधून हा गांजा नेण्यात येत होता. हैद्राबादमधून आलेला हा ट्रक जळगावकडे जात होता. हा गांजा जळगांवमधूनच महाराष्ट्रात इतरत्र पाठविण्यात येणार होता, अशी माहिती एनसीबीच्या अधिकार्‍याने दिली.

मध्य प्रदेशात अमली पदार्थ तस्करीचे ऑनलाईन रॅकेट उद्ध्वस्त

मध्य प्रदेशात अमली पदार्थांच्या ऑनलाईन तस्करीचे एक रॅकेट उद्ध्वस्त झाले आहे. मध्य प्रदेशात रविवारी दोन जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ऍमेझॉनच्या वेबसाईटवरून या गांजाची विक्री सुरू होती. कडीपत्त्याच्या नावाखाली हा गांजा विकला जात होता.

या प्रकरणात अटक कल्लू पवैया याने बनावट पॅनकार्ड क्रमांक व जीएसटी क्रमांकासह ऍमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीकडे फर्मची नोंदणी केली होती व याद्वारे या ऑनलाईन पोर्टलवरून कडीपत्त्याच्या नावाखाली गांजा विकण्यात येत होता. एक टन गांजा त्यांनी आतापर्यंत ऑनलाईन विकला असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी या ई-कॉमर्स कंपनीवरही कारवाईचा विचार होत आहे.

leave a reply