सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून जगातील पहिल्या ‘नॉन-प्रॉफिट सिटी’ची घोषणा

रियाध – सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी जगातील पहिली ‘नॉन प्रॉफिट सिटी’ उभारण्याची घोषणा केली आहे. हे शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘नॉन-प्रॉफिट सेक्टर’ विकसित करण्याच्या योजनेचा भाग असून युवा वर्ग तसेच स्वयंसेवी गटांसाठी ऊर्जा व प्रोत्साहन देणारे केंद्र ठरेल, असा दावा सौदीकडून करण्यात आला आहे. सौदीच्या राजवटीकडून वैशिष्ट्यपूर्ण व स्वतंत्र शहर उभारण्याच्या योजनेची घोषणा होण्याची गेल्या चार वर्षातील ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीच ‘निऑम’ व ‘द लाईन’ अशा शहरांच्या उभारणीची घोषण केली आहे.

सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून जगातील पहिल्या ‘नॉन-प्रॉफिट सिटी’ची घोषणाशनिवारी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी, राजधानी रियाधनजिक जगातील पहिली ‘नॉन-प्रॉफिट सिटी’ उभारण्याची तयारी सुरू झाल्याचे जाहीर केले. ‘सौदी अरेबियातील मिस्क फाऊंडेशनच्या उद्दिष्टांचा भाग असलेल्या संशोधन व उद्योजकतेला प्रोत्साहन आणि भविष्यातील नेतृत्त्व तयार करण्याच्या योजनेला अनुसरून जगातील पहिल्या नॉन प्रॉफिट सिटीची उभारणी करण्यात येत आहे. या शहरात उपलब्ध होणार्‍या संधी नॉन प्रॉफिट क्षेत्राला मध्यवर्ती ठेऊन आखण्यात येतील. शहरात येणार्‍या व त्यात योगदान देणार्‍या सर्वांना चांगले वातावरण उपलब्ध करून करून देण्याचा प्रयत्न असेल’, असे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितले.

सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून जगातील पहिल्या ‘नॉन-प्रॉफिट सिटी’ची घोषणारियाध शहरानजिक असणार्‍या ‘इरकाह’ भागात जगातील पहिली ‘नॉन-प्रॉफिट सिटी’ उभारण्यात येणार आहे. या शहराचे क्षेत्रफळ ३.४ चौरस किलोमीटर इतके असून शहरातील ४४ टक्क्यांहून अधिक भाग ‘ग्रीन ओपन स्पेस’ असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. ‘नॉन-प्रॉफिट सिटी’ हे शहर ‘ऍडव्हान्स डिजिटल मेट्रोपोलिस’ असून त्यासाठी ‘डिजिटल ट्विन मॉडेल’चा वापर करण्यात येईल, असे सौदीच्या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटले आहे. शहरात शिक्षणसंस्थांसह म्युझियम, कला अकादमी, प्रगत तंत्रज्ञानांवर संशोधन करणारे केंद्र, कॉन्फरन्स सेंटर यासह एकात्मिक नागरी संकुलाचा समावेश असेल, असेही सांगण्यात येते.

सौदी अरेबिया हा देश इंधनक्षेत्रावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था म्हणून ओळखण्यात येतो. मात्र गेल्या दशकात इंधनाच्या दरांमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सौदीच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्के बसले होते. या धक्क्यांच्या पार्श्‍वभूमीवर सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ‘व्हिजन २०३०’ नावाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार इंधनावर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था हे सौदीचे चित्र बदलून तंत्रज्ञान, पर्यटन व इतर उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २०१७ साली ‘निऑम’ या प्रगत तंत्रज्ञानावर आधारलेल्या शहराची घोषणा करण्यात आली होती.

leave a reply