रशिया-युक्रेनमधील युद्धावर आखाती देशांची एकजूट कायम – सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

रियाध – युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर आखाती देशांनी रशियाच्या विरोधात जाऊन इंधनाच्या उत्पादनात वाढ करावी, अशी मागणी अमेरिकेने केली होती. सौदी व इतर इंधन उत्पादक आखाती देशांनी त्याला नकार दिला होता. यानंतरच्या काळात अमेरिकेने या आखाती देशांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. रशिया-युक्रेन युद्धाला तीन महिने पूर्ण झाल्यानंतरही आखाती देश आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आखाती देश आणि रशियामध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर सौदी अरेबियाने ही घोषणा केली.

सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये रशिया आणि ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी` या आखाती देशांच्या संघटनेत पाचवी धोरणात्मक बैठक पार पडली. यामध्ये रशिया तसेच जीसीसी सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले होते. या बैठकीच्या निमित्ताने रशिया-युक्रेन युद्ध, इंधनाचे उत्पादन, इराणचा अणुकार्यक्रम, येमेनमधील संघर्षबंदी या प्रमुख मुद्यांवर चर्चा पार पडली. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी आपल्या देशाची भूमिका मांडली. तर युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रि कुलेबा हे व्हर्च्युअल माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.

यानंतर सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी रशिया-युक्रेन युद्धावर जीसीसीची भूमिका मांडली. ‘याआधी आखाती देशांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत संघटीतपणे भूमिका स्वीकारली होती व आजही आखाती देश आपल्या याच भूमिकेवर ठाम आहेत. या युद्धामुळे जगभरात कुठेही भीषण अन्नसंकट उभे राहू नये, अशी जीसीसीची अपेक्षा आहे. रशिया व युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनाही जीसीसीच्या सदस्य देशांची ही भूमिका कळविण्यात आली आहे`, असे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी जाहीर केले. तर या युद्धावर राजकीय वाटाघाटीतून तोडगा काढण्यात यावा, अशी सौदीची भूमिका असल्याचे प्रिन्स फैझल म्हणाले.

या बैठकीनंतर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सौदी तसेच युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेतली. अमेरिका, युरोपिय मित्रदेशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांच्या मोहिमेत आपले देश सहभागी होणार नसल्याची हमी, आखाती देशांनी रशियाला दिल्याचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह म्हणाले. तसेच इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक प्लस` या संघटनेत असलेल्या समन्वयाचे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी कौतूक केले.

दरम्यान, रशिया व आखाती देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये ही बैठक सुरू असताना, अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आखात भेटीचे संकेत दिले आहेत. येत्या महिनाअखेरीस राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीला भेट देणार असल्याचे अमेरिकी व पाश्‍चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे. सौदी व इतर ओपेक सदस्य देशांनी इंधनाचे उत्पादन वाढवावे, अशी प्रमुख मागणी घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सौदीचा दौरा करणार असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

leave a reply