रशियाकडून राजधानी मॉस्कोजवळ ‘न्यूक्लिअर ड्रिल्स`

मॉस्को – मंगळवारी बायडेन प्रशासनाने युक्रेनला ‘हायमार्स रॉकेट सिस्टिम`सह 70 कोटी डॉलर्सची प्रगत शस्त्रास्त्रे पुरविण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. रशियाने बुधवारपासून राजधानी मॉस्कोनजिक ‘न्यूक्लिअर ड्रिल्स`ला सुरुवात केली आहे. या सरावात रशियाच्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस`चा भाग असलेल्या हजार जवानांसह ‘यार्स` या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. अमेरिकेसह नाटोकडून युक्रेनला पुरविण्यात येणाऱ्या प्रगत शस्त्रांची बाब रशियाने अतिशय गांभीर्याने घेतल्याचे संकेत नव्या सरावातून मिळत आहेत. गेल्याच महिन्यात अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए`चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी रशियाकडून अण्वस्त्रहल्ला होण्याचा धोका दुर्लक्ष करण्यासारखा नाही, असे बजावले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एका दैनिकात लिहिलेल्या लेखात युक्रेनला प्रगत शस्त्रास्त्रे पुरविण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. हे समर्थन करतानाच रशियाकडून असलेल्या अणुहल्ल्याच्या धोक्याचाही उल्लेख केला. रशियाने युक्रेन युद्धात अण्वस्त्रांचा वापर केल्यास तो अस्वीकारार्ह असेल व त्याचे गंभीर परिणाम रशियाला भोगावे लागतील, असा इशारा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिला. रशिया अणुहल्ल्यावरून वारंवार वक्तव्ये करीत असून हे धोकादायक असल्याचेही त्यांनी बजावले.

बायडेन यांचा हा इशारा प्रसिद्ध होत असतानाच रशियाने पुन्हा एकदा आण्विक हालचालींना सुरुवात केल्याचे समोर येत आहे. राजधानी मॉस्कोजवळ असलेल्या इव्हानोव्हो प्रांतात रशियाने ‘न्यूक्लिअर ड्रिल्स` सुरू केले आहे. या सरावात रशियाच्या ‘स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्सेस`चे सुमारे हजार जवान सहभागी झाले आहेत. रशियन ‘न्यूक्लिअर ट्रायड`चा भाग असलेल्या ‘यार्स` आंतरखंडिय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा सरावात समावेश करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला 10 हजार किलोमीटर्सहून अधिक असल्याचे सांगण्यात येते.

युक्रेनबरोबरील युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘न्यूक्लिअर फोर्सेस`ना अलर्टचे आदेश दिले होते. त्यानंतर रशियाने दोनदा ‘सरमात` या हायपरसोनिक अण्वस्त्राची चाचणी घेतली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह वरिष्ठ रशियन नेते तसेच अधिकाऱ्यांनी सातत्याने आण्विक हल्ल्याबाबत इशारे दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर दोनदा अणुहल्ल्याचे संकेतही दिले होते. पुतिन यांच्या या इशाऱ्यांमुळे पाश्‍चिमात्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यात रशियाने राजधानी मॉस्कोनजिक न्यूक्लिअर ड्रिल्स`ला सुरुवात केल्याने पाश्‍चिमात्य देशांसमोरील चिंतेत अधिकच भर पडल्याचे दिसते.

leave a reply